पवनेल | वार्ताहर |
तब्येत खालावलेल्या उपोषणकर्त्या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यासाठी गेलेल्या महिला पोलिसाला धक्काबुक्की करून मारहाण केल्याचा प्रकार तळोजामध्ये घडला. या प्रकरणात उपोषणकर्त्या महिलेसह पाच जणांविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. तळोजा येथे राहणाऱ्या रुही सुर्वे नामक महिलेने शिर्के कन्स्ट्रक्शन विरोधात उपोषण सुरू केले आहे. शिर्के कन्स्ट्रक्शनकडून त्यांच्या जमिनीवर इमारती बांधण्यात येत असल्याने मोबदला मिळावा, अशी त्यांची मागणी आहे. अशातच आंदोलनकर्त्या रुही सुर्वे यांची 13 मे रोजी तब्येत खालावली होती. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कळवल्यानंतर रुही सुर्वे यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी तळोजा पोलिस ठाण्यातील महिला पोलिसांसह इतर अधिकारी रात्री 9 च्या सुमारास घटनास्थळावर गेले होते. यावेळी पोलिसांनी रुही सुर्वे यांना उपचारासाठी रुग्णालयात येण्याची विनंती केली. मात्र, त्यांची बहीण माही मानकामे यांनी रुही सुर्वे यांना विरोध केल्याने महिला पोलिसाला दुखापत झाली होती.