अतिवृष्टीमुळे भातशेती गेली वाहून
पाताळगंगा | वार्ताहर |
गेली अनेक दिवस पावसाने थैमान घातल्यामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतामध्ये पाणी जास्त झाल्यामुळे भातशेती कुजली असून, डोंगराळ भागात असलेली शेती मातीमध्ये गाडली गेली आहे. पावसाच्या पाण्याचा प्रवाह मोठा असल्यामुळे लागवड केलेले भात या प्रवाहाच्या दिशेने वाहून गेल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
दिवसेंदिवस शेती लागवडीचे क्षेत्र कमी होत असताना त्यातच नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी पुरता हैराण झाला आहे. शेतीमध्ये टाकलेला पैसा वसूल होणे दूरच, तर वर्षभर आपल्या कुटुंबाला पुरेल इतके धान्य मिळेल की नाही याची शाश्वती नसल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. पावसाच्या पाण्यामध्ये भातशेती पाण्याखाली गेल्यामुळे भाताची रोपे कुजली आहेत. काही ठिकाणी संपूर्ण भातशेती पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेल्यामुळे पुढील काही महिने कसे काढायचे, हा प्रश्न शेतकर्यांना सतावत आहे.
तालुक्यातील आजही भातलागवड करुन कुटुंबाचा उदारनिर्वाह याच माध्यमातून केला जात आहे. मात्र, दरवर्षी पावसाचे धुमशान सुरु असल्यामुळे भातशेतीला धोका निर्माण झाल्याचे शेतकर्यांचे म्हणणे असून, मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.