इंग्लंड खेळाडू मायदेशी परतण्यावर टीका

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

इंग्लंडचे खेळाडू पूर्ण आयपीएलसाठी उपलब्ध असतील, असे आम्हाला सांगण्यात आले होते; परंतु विश्‍वकरंडक स्पर्धेच्या तयारीसाठी त्यांचे खेळाडू प्ले ऑफच्या अगोदर मायदेशी परतले हे दुर्दैवाचे आहे, अशी निराशा आयपीएलचे आयुक्त अरुण धुमल यांनी व्यक्त केली.

1 जूनपासून सुरू होणार्‍या ट्वेन्टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी इंग्लंडने जाहीर केलेला संघ तयारीसाठी पाकविरुद्ध मायदेशात ट्वेन्टी-20 मालिका खेळणार आहे, त्यासाठी जॉस बटलरसह त्यांचे वर्ल्डकप संघातील खेळाडू मायदेशी परतले आहेत. या प्रकारामुळे आयपीएल आयुक्त नाराज झाले आणि त्यांनी दुर्दैवी अशा शब्दात आपले मत व्यक्त केले. या आयपीएलमध्ये आपले सर्व खेळाडू पूर्ण स्पर्धेपर्यंत उपलब्ध असतील, असे इंग्लंड क्रिकेट मंडळाने आम्हाला कळवले होते, असे ते म्हणाले.

इंग्लंड क्रिकेट मंडळाच्या प्रशासनातील व्यक्ती बदलल्या. अगोदरचे प्रशासन आणि आत्ताचे यांच्यामध्ये योग्य संवाद झाला नाही. नव्या प्रशासनातील व्यक्तींना पाकविरुद्धच्या मालिकेची माहिती नसावी आणि त्यांनी अचानक या मालिकेसाठी सर्वोत्तम संघ खेळायला हवा, अशी भूमिका घेतली असावी, असे धुमल यांनी सांगितले. बटलर मायदेशी परतल्यामुळे राजस्थान रॉयल्स संघाला मोठा फटका बसला. प्ले ऑफसाठी बटलर आणि फिल साल्ट हे महत्त्वाचे खेळाडू आहेत. त्यांनी आयपीएल पूर्ण करावी, यासाठी बीसीसीआयने प्रयत्न केले. आम्ही इंग्लंड मंडळाशी चर्चा केली आहे. भविष्यात असे प्रकार घडू नये, यासाठी काळजी घ्यावी, असे आम्ही त्यांना सांगितले आहे. प्रशासनातील व्यक्तींमध्ये बदल झाला तरी काही निर्णय बदलायचे नसतात, असे धुमल म्हणाले.

Exit mobile version