काँग्रेस कार्यकर्ता बैठकीत मोदी सरकारवर टीकास्त्र

विघातक प्रवृत्तीविरोधातील संघर्षासाठी पुढे या
प्रशांत यावद यांचे तरूणाईला आवाहन

। चिपळूण । प्रतिनिधी ।
शहरातील पालोजी मोहल्ला येथे काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत काँग्रसचे चिपळूण तालुका प्रशांत यादव यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र डागत, विघातक प्रवृत्तीविरोधातील संघर्षासाठी तरूणाईने पुढे येण्याचे आवाहन केले आहे.
आयोजित बैठकीला संबोधिताना प्रशांत यादव म्हणाले की, देशाचे आधारस्तंभ म्हणून तरुणांकडे पाहिले जाते. मात्र काही घातक प्रवृत्ती तरुणांना हेरून त्यांच्यात द्वेषाची भावना पसरविण्याचे काम करत आहेत. काँग्रेसने अशा प्रवृत्तींविरोधात लढा सुरू केला आहे. त्यामुळे तरुणांनी विचलित न होता काँग्रेसच्या या लढ्यात पुढाकार घ्यावा.
तसेच मोदी सरकारच्या कार्यपद्धतीवर टीकास्त्र डागत यादव म्हणाले की, देशात अराजकता माजविण्याचे काम मोदी सरकार करत आहे. महागाई आणि इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवरून सर्वसामान्यांचे लक्ष विचलित करून समाजात तेढ निर्माण करण्याचे घातक अस्र वापरले जात आहे. त्यांच्या या कुकर्माला प्रत्युत्तर देण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली असल्याचे प्रतिपादन त्यांनी केल.
याशिवाय, पक्षाचे नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी मोदी सरकारच्या कारभाविरोधात मैदानात उतरले असल्याचे सांगताना ते म्हणाले की, जनजागरण अभियानाच्या माध्यमातून लोकांमध्ये जागृती करण्याची मोहीम काँग्रेसने महाराष्ट्रातही सुरू केली आहे. कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन काँग्रेसची विचारधारा पोहचवण्याचे काम केले पाहिजे. सोशल मीडियाचा वापर करून मोदी सरकार महागाई आणि इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवरून सर्वसामान्यांना विचलित करत आहे. यात त्यांच्याकडून तरुणांवर अधिक टार्गेट केले जात आहे. समाजात तेढ, द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
यावेळी तरूणाईला सावधानतेचा इशारा देताना ते म्हणाले की, तरुणांनी वेळीच सावध होण्याची गरज आहे. कारण देशाचे भवितव्य तुमच्याच हाती आहे. सोशल मीडियावर प्रसारित होणार्‍या खोट्या प्रचाराला आणि देशातील महान नेत्यांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणार्‍यांना सडेतोड उत्तर देण्यासाठी चिपळूण तालुका काँग्रेस आता मैदानात उतरली आहे, असेही यादव म्हणाले.
या बैठकीला उपनगराध्यक्ष सुधीर शिंदे, नगरसेवक करामत मिठागरी, काँग्रेसचे शहराध्यक्ष लियाकत शाह, जीवन रेळेकर, सचिव शमून घारे, अन्वर जबले, इम्तियाज कडू, महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष श्रद्धा कदम, विद्यार्थी काँग्रेसच्या शहराध्यक्ष गौरी हरधारे, शाहनवाज पोटे, रज्जाक मुकादम, अफ्फान मुकादम, ईमाद तसाब, कैफ काद्री, उबेद मुकादम, हसिब नलंबद, नदिम शिरीळकर आदी उपस्थित पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version