भारताच्या दुय्यम संघाच्या निवडीवरून टीका

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

आशियाई स्पर्धेला चीनमधील हांगझाऊ येथे 23 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. या मानाच्या स्पर्धेमध्ये भारताचा फुटबॉल संघही सहभागी होणार आहे; मात्र यासाठी भारतीय संघात तुलनेने कमी अनुभव असलेल्या खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. हाच धागा पकडत भारतीय फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक इगोर स्टिमॅक यांनी आयएसएल आयोजक व क्लब्स यांच्यावर टीका केली आहे. खेळाडूंना आशियाई स्पर्धेसाठी मुक्त करण्यापासून दूर ठेवणाऱ्या व्यक्तींमुळे सर्वोत्तम संघ निवडला गेलेला नाही.

स्टिमॅक पुढे स्पष्ट म्हणाले, आशियाई स्पर्धेसाठी अडथळा येणार होता. हे मला आधी समजले असते, तर मी आय लीग स्पर्धेतील खेळाडूंची निवड केली असती. तसेच दोन महिने त्यांच्याकडून सराव करवून घेतला असता. यामधून आशियाई स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड केली असती. भारतीय संघाच्या प्रशिक्षकांनी परखड मत व्यक्त करताना म्हटले की, भारतीय संघाच्या निवडीला विलंब झाला. त्यामुळे भारतीय संघाचे प्रयाणही लांबणीवर गेले. आता आपला संघ सोमवारी तेथे पोहोचणार आहे. खेळाडूंना तेथे पोहोचल्यानंतर विश्रांती मिळावी, यासाठी आम्हाला विमानातच योजना आखावी लागली आहे.

कडवी झुंज देण्याचा प्रयत्न
इगोर स्टिमॅक सांगतात, भारतीय संघातील खेळाडूंनी एक संपूर्ण दिवसही सोबत घालवलेला नाही; पण तरीही बाद फेरी गाठण्याची आशा आहे. अशा परिस्थितीत कोणतीही अपेक्षा करणे चुकीची आहे. मी आशियाई स्पर्धेमधून मोठी अपेक्षा बाळगत नाही; पण प्रतिस्पर्ध्यांना कडवी झुंज देण्याचा प्रयत्न नक्कीच करू, असा विश्वास त्यांनी पुढे व्यक्त केला.
Exit mobile version