| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
आशियाई क्रीडा स्पर्धा 23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर या दरम्यान चीनमधील हांगझाऊ येथे होणार आहेत. या स्पर्धेसाठी भारतीय कुस्तीपटूंची निवड चाचणी घ्यावी लागणार आहे. भारतीय खेळाडूंची नावे देण्याची अंतिम तारीख 15 जुलै आहे; मात्र बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात केलेल्या आंदोलनामुळे भारतातील काही कुस्तीपटूंनी निवड चाचणी पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी केली आहे. आशियाई ऑलिंपिक काऊन्सिलकडे याबाबत पत्रही पाठवण्यात आले आहे, पण त्यावर अद्याप उत्तर मिळालेले नाही. त्यामुळेच भारतीय ऑलिंपिक संघटनेची मितीची मंगळवारी बैठक होऊनही निवड चाचणीची तारीख निश्चित झालेली नाही.
बजरंग पुनिया, साक्षी मलिक, विनेश फोगाट यांच्यासह आणखी काही कुस्तीपटूंनी बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात नवी दिल्ली येथे 38 दिवसांचे आंदोलन केले. त्यामुळे त्यांना कुस्तीच्या सरावासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही. शारीरिक तंदुरुस्तीकडेही त्यांना लक्ष देता आले नाही. याच कारणामुळे त्यांनी निवड चाचणी पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी केली. आयओएकडून आशियाई ऑलिंपिक काऊन्सिलकडे 15 जुलैपर्यंत खेळाडूंच्या नावांची यादी द्यावयाची आहे, पण आयओएकडून 10 ऑगस्टपर्यंतची मुदत मागण्यात आली आहे.