ढगाळ वातावरणाचा पिकांना धोका

आंबा, कांदा, तोंडली पीक अडचणीत

| अलिबाग | प्रतिनिधी |

जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. ढगाळ वातावरणामुळे आंबा, तोंडली व पांढरा कांदा पीक अडचणीत सापडण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली. त्यामुळे किडरोगांचा परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. रायगड जिल्ह्यामध्ये आंब्याचे 14 हजार हेक्टर क्षेत्र पीक असून, 12 हजार 500 हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम आहे. अलिबाग, मुरुड, रोहा, श्रीवर्धन या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आंब्याची लागवड केली जाते. वीस हजारांहून अधिक शेतकरी भातशेतीला पूरक म्हणून आंब्याची लागवड करत आहेत.

अलिबाग तालुक्यात तोंडलीचे क्षेत्र 232.80 हेक्टर आहे. सुमारे 855 शेतकरी तोंडली उत्पादक आहेत. भात कापणीची कामे संपल्यावर तोंडलीची लागवड करण्यास सुरुवात झाली आहे. जाडी व कळी तोंडली अशा दोन प्रकारामध्ये तोंडली बाजारात वेगवेगळ्या भावामध्ये विकली जाते. हळदी समारंभासह अन्य बाजारात तोंडलीला प्रचंड मागणी आहे. अलिबागमधील पांढरा कांदा आकाराने मध्यम असून, चविष्ठ व औषधी मानला जातो. या कांद्यालाही मोठी मागणी असते. अलिबाग तालुक्यातील कार्ले, खंडाळे, नेहुली, बामणगाव व रामराज परिसरात कांद्याची लागवड केली जाते. कार्ले परिसरात प्रत्येक घरातील शेतकरी पांढऱ्या कांद्याची लागवड करीत आहेत. रोहा तालुक्यातील खांब व देवकान्हे या गावांमध्येही काही प्रमाणात कांद्याची लागवड होत आहे. कांद्यापासून सुमारे एकरी सहा टन, तर हेक्टरी 15 टन उत्पादन मिळते. यातून सुमारे तीन कोटींची उलाढाल होते. कांदा लागवडीपासून दीड हजार शेतकऱ्यांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो.

जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून थंडी सुरू झाली आहे. त्यामुळे काही ठिकाणी आंब्याला मोहर येण्यास सुरुवात झाली आहे. भातकापणीची कामे संपल्यावर पांढऱ्या कांद्याच्या लागवडीला सुरुवात झाली आहे. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून अचानक वातावरणात बदल होऊ लागला आहे. कधी ऊन, तर कधी पाऊस, तर कधी ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्याचा परिणाम आंबा, तोंडली, पांढरा कांदा पिकावर होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. बियाण्यांसाठी लावण्यात आलेल्या कांद्याला पावसाचे पाणी घातक आहे. उगवणीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. कांद्याला बुरशी लागण्याची भीती आहे. आंब्याच्या मोहरावर परिणाम होऊन तुडतुड्या व अन्य कीडरोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. या पिकांवर त्याचा परिणाम होऊन वेगवेगळ्या रोगांचा धोका होऊ शकतो, असे शेतकरी प्रभाकर नाईक यांनी सांगितले.

कांद्याला बुरशी आल्यावर पिकाच्या उत्पादनात घट होण्याची भीती आहे. आंब्याला मोहर येण्यास सुरुवात झाली आहे. पण, या ढगाळ वातावरणामुळे तो मोहर गळून पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सतीश म्हात्रे, शेतकरी
Exit mobile version