पूलदुरुस्तीसाठी करोडोंचा चुराडा

फुंडे पूल वाहतुकीसाठी दोन वर्षांपासून बंद; बांधकाम विभाग, सिडकोच्या वादात काम रखडले


| उरण | वार्ताहर |

अत्यंत वर्दळीच्या उरण-पनवेल राज्य मार्गावर असणारा फुंडे गावाजवळील पूल कमकुवत झाल्याने गेल्या दोन वर्षांपासून या पुलावरून अवजड वाहतूक बंद ठेवली आहे. मात्र, आता या पुलाचे नूतनीकरण करण्याऐवजी सिडकोमार्फत या पुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी सुमारे 2 कोटी 70 लाखांचा निधी खर्च करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, या कमकुवत पुलावर इतका खर्च करणे म्हणजे केवळ थुकपट्टी असल्याची भावना जनतेतून व्यक्त होत आहे.

उरण-पनवेल या मार्गावरून दररोज शेकडो लहान मोठी वाहने पनवेल,नवी मुंबई, ठाणे या विभागात जाण्यासाठी मार्गक्रमण करीत असतात. अशा या अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावरील फुंडे गावाजवळील द्रोणागिरी नोड येथील पूल कमकुवत होऊन दोन वर्षांपूर्वी या पुलाचा काही भाग खचला होता. त्यामुळे या मार्गावर अपघात होऊ नये म्हणून पुलाच्या सुरक्षेसाठी अवजड वाहतूक बंद करण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभाग उरण आणि सिडकोने घेतला. तद्नंतर या पुलाचे नूतनीकरण कोणी करावे, या वादात सिडको व सार्वजनिक बांधकाम खाते यांनी दोन वर्षांचा काळ घालवला.

मात्र, नुकताच सिडकोने या पुलाच्या दुरुस्तीसाठी सुमारे पावणे तीन कोटींचा निधी मंजूर करून पुलाच्या काही भागाच्या दुरुस्तीचे काम सुरु केल्याची माहिती मिळत आहे. मात्र, सदर दुरुस्तीचे काम म्हणजे पुलाच्या कमकुवत भागावर सिमेंट काँक्रिटची मलमपट्टी असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, या पुलाचे आयुष्यच संपले असताना अशा पुलाच्या दुरुस्तीवर करोडोंचा खर्च सिडको अधिकारी का करीत आहेत, असा सवाल व्यक्त होत असून, इतक्या निधीमध्ये तो पूल नव्याने बांधता येईल, असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.

अधिकाऱ्यांची टोलवाटोलवी

याबाबत द्रोणगिरी विभागाचे सिडकोचे कार्यकारी अभियंता मोहन मुंडे यांना विचारले असता यासंदर्भात माहिती सिडकोच्या जनसंपर्क अधिकारीच देऊ शकतात असे सांगितले, तर सिडकोच्या जनसंपर्क अधिकारी प्रिया रातांबे यांना संपर्क केला असता त्यांनी याबाबत अभियंत्यांकडून माहिती घेऊन सांगावे लागेल असे सांगून आपले हात झटकले आहेत.

कंत्राटदाराशी साटेलोटे करून अशा कामांना करोडोंची थुकपट्टी लावून पैसा कमावताना जनतेच्या जीवाशी सिडको अधिकारी खेळ खेळत असून, या पुलावर येणाऱ्या काळात अपघात झाला तर त्याला जबाबदार हे सिडकोचे अभियंता असतील.

दिपक पाटील, सामाजिक कार्यकर्ते
Exit mobile version