कार्तिकी एकादशीनिमित्त 200हून अधिक मंदिरात भाविकांची गर्दी
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील विठ्ठल मंदिरांमध्ये शनिवारी (दि.21) मंगलमय सोहळा साजरा झाला. कार्तिकी एकादशीनिमित्त अलिबागसह जिल्ह्यातील दोनशेहून अधिक विठ्ठल-रुक्मिणी मंदिरांमध्ये दर्शनासाठी सकाळपासून भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. विधिवत पूजा, अभिषेक, भजन, कीर्तन आणि विविध धार्मिक कार्यक्रमांसह विठ्ठल नामाच्या जयघोषाने जिल्ह्यातील मंदिर परिसर भक्तिमय झाले होते.
कार्तिकी एकादशीनिमित्त मंदिरामध्ये पहाटेच्यावेळी काकड आरती, अभिषेक, महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवानिमित्त मंदिरांवर आणि परिसरात आकर्षक फुलांची सजावट आणि विद्यूत रोषणाई करण्यात आली होती. टाळ मृदूंगाच्या गजरात हरिनामाचा जयघोष करीत सकाळपासून विठ्ठल रखुमाईच्या मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी होऊ लागली. अलिबाग शहराच्या नजीक असलेल्या वरसोली येथील आंग्रेकालीन विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पहाटेपासूनच भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. विधिवत पूजा आणि धार्मिक विधी पार पडल्यानंतर भाविकांसाठी दर्शन खुले करण्यात आले. वेगवेगळ्या भागातील भजनी मंडळांनी भजनातून विठुरायाचा गजर केला. प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील साजगाव येथील विठ्ठल मंदिरातही कार्तिकी एकादशीनिमित्त भाविकांनी अलोट गर्दी करून रांगेतून विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेतले. जिल्ह्यातील अलिबागसह विविध गावांमधील विठ्ठल मंदिरांत पारंपरिक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण परिसर भजन किर्तनासह हरिनामाच्या जयघोषाने दणाणून गेला होता.एक वेगळा उत्साह या निमित्ताने भाविकांच्या चेहऱ्यावर दिसून आला. कार्तिकी एकादशीचे महत्वदेखील या निमित्ताने पटवून देण्याचा प्रयत्न भजन, किर्तनाच्या माध्यमातून देण्यात आला. दरम्यान जिल्ह्यातील काही मंदिरांच्या परिसरात खाद्य पदार्थांसह पुजेचे साहित्य हार,तुळस, फुलांंची दुकाने सजली होती.
