| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
संकष्टी चतुर्थीला रविवारी (दि.9) अष्टविनायकांपैकी एक तीर्थक्षेत्र असलेल्या पालीतील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. पहाटे पासून बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या होत्या. यावेळी छोट्या-मोठ्या व्यावसायिकांचा धंदा तेजीत होता.
रविवारची सुट्टी असल्याने रायगड जिल्ह्यासह मुंबई, ठाणे, पुणे व राज्यातून पालीत हजारोच्या संख्येत भाविक व त्यांची वाहने दाखल झाली होती. त्यामुळे वाहतूक कोंडी देखील झाली होती. भाविकांची मोठी गर्दी असल्याने येथील दुकानदार व हॉटेल व्यवसायिक यांचा धंदा देखील तेजीत होता. परिसरातील दुकाने, हॉटेल व लॉज ग्राहकांनी गजबजले होते. येथील हॉटेल, खेळण्याची व शोभिवंत वस्तुंची दुकाने, नारळ, हार, फुले व पापड मिरगुंड, कडधान्य विक्रेते, प्रसाद व पेढेवाले सुखावले होते. मंदिर परिसरात मोठी वर्दळ होती. बल्लाळेश्वर मंदिर परिसरात फळे, ओले काजूगर, कंदमुळे व रानमेवा घेऊन अनेक विक्रेत्या महिला विक्री करत आहेत. देवळात येणारे भाविक आवर्जून येथून हा रानमेवा खरेदी करतांना दिसले. त्यामुळे या विक्रेत्यांचा धंदा सुद्धा चांगला झाला. भाविकांच्या सोईसाठी बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने चोख व्यवस्था करण्यात आली होती.