गांधारपाले लेण्यांवर पर्यटकांची गर्दी

| महाड | वार्ताहर |
मुंबई-गोवा महामार्गावर महाडजवळ गांधारपाले येथील बौद्धकालीन लेणी पाहण्यासाठी सध्या पर्यटकांची गर्दी होत आहे. महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे या लेणी पाहण्यासाठी प्रवासीही आवर्जून थांबतात.

गांधारपाले येथे डोंगरात कोरलेली अप्रतिम लेणी इतिहास संशोधक, पर्यटक व अभ्यासकांना पर्वणी आहेत. डोंगरात तीन स्तरामध्ये 28 लेण्या कोरलेल्या आहेत. त्यात 3 चैत्यगृह आणि 19 विहार आहेत. काही पायऱ्या चढून लेण्यांजवळ पोहोचल्यावर महाड शहर, चांभारगड, सावित्री नदी आणि सभोवतालची शेती आणि हिरवेगार झाडे असा सुंदर देखावा दिसतो.

गांधारपाले येथील लेणी कुंभोज वंशातील विष्णुपुलीत राजाच्या काळात खोदलेली आहेत. पहिल्या वरच्या स्तरात वीस आणि दुसऱ्या स्तरात उर्वरित अशी लेणी आहेत. लेणी पूर्वार्भिमुख आहेत. लेण्यामध्ये बसण्यासाठी दगडी बाके तयार केली आहेत. पाण्याची व्यवस्था, ध्यानधारणेसाठी खोल्या व प्रार्थना घरे, अनेक लोकांना बसता यावे या साठी भव्य सभागृह याठिकाणी आहे. लेण्यांच्या काही खोल्यांमध्ये पाली भाषेतील शिलालेख पाहायला मिळतात. एका शीळेवर प्रलंबपदासन मुद्रेतील बुद्धमूर्ती आहे. पुढील भागात पाण्याची तीन टाक्या आहेत. लेणीत एक शिलालेख आहे. खोल्या सभागृह, दिर्घिका, स्तंभ, अर्धस्तंभ, चैत्यगृह, शिलालेख, ओटे, वेलबुट्टी, नक्षीकाम, लहान-मोठी प्रवेशद्वारे, भोजनगृह, स्तूप, गाभारा, दगडी पाण्याची टाके, प्रतिमा असे सुंदर कोरीवकाम या लेण्यांमध्ये पहावयास मिळते. पर्यटक, अभ्यासक, इतिहास संशोधकांची याठिकाणी नेहमीच वर्दळ असते.

सध्या दिवाळीच्या सुट्या असल्याने भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्या वाढली आहे. या मार्गावरून महाबळेश्वर, कोकणात तसेच गोव्याकडे जाणारे पर्यटन आवर्जून थांबून लेणी बघतात. याशिवाय मुंबई-पुणे तसेच इतर शहरांमधील खासगी कंपन्यांकडूनही पर्यटन सहलींमध्ये गांधारपाले येथील लेण्यांचा समावेश केला जात आहे.

स्थानिकांना रोजगाराची संधी
गांधारपाले लेण्यांवर जाण्यासाठी पुरातत्त्व विभागाने काही वर्षांपूर्वी पायऱ्या बांधलेल्या आहेत. अतिवृष्टीत कोसळलेले दोन स्तूपही पुन्हा पायथ्याशी स्थापित केलेले आहे. सध्या पर्यटकांना केवळ तळमजल्यावरील लेणी पाहता येते. अतिवृष्टीमुळे दोन मजल्याच्या लेण्यांच्या मार्ग वाहून गेल्याने, त्याची पडझड झाल्याने पुरातत्त्व विभागाने या ठिकाणचा मार्ग बंद केला आहे. लेण्यांवरून महाड शहराचे विहंगम दृश्य दिसत असल्याने स्थानिकही मोठ्या संख्येने येतात. पर्यटक वाढल्याने लेण्यांच्या पायथ्याशी असणाऱ्या स्थानिक ग्रामस्थांना रोजगार उपलब्ध होत आहे.

Exit mobile version