| महाड | प्रतिनिधी |
महाड शहराजवळील गांधारपाले गावच्या हद्दीत भरधाव ट्रकने टेम्पोला दिलेल्या धडकेत टेम्पोचालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. हा अपघात बुधवारी (दि.13) रात्री 2 वाजण्याच्या सुमारास घडला.
याबाबत मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर गांधारपाले हद्दीत आयशर टेम्पोवरील चालक वैभव राजाराम बेनकर (वय 32, रा. रत्नागिरी) हा गोवा बाजूकडून मुंबईकडे जात असताना अचानक समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने टेम्पोला जोरदार धडक दिली. यामध्ये टेम्पोचालकाचा मृत्यू झाला, तर त्याचा सहकारी मनीष शामसुंदर मस्के (वय 32, रा.संगमेश्वर) हा जखमी झाला. अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला असून टेम्पोचालकाला महामार्ग पोलीस व ग्रामस्थांच्या अथक प्रयत्नानंतर टेम्पोतून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर महाड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले असता तिथे त्याला मृत घोषित केले.
याप्रकरणी अज्ञात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास महाड शहर पोलीस ठाणेमार्फत सुरू आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अवजड वाहनांना बंदी केल्यानंतर रात्री उशिरा ही अवजड वाहने प्रवास करीत असतात. महामार्गाचे काम अजूनही अपूर्ण आहे. दिशादर्शक फलक आणि धोकादायक वळणे रात्री नीट दिसत नसल्यामुळे दिवसेंदिवस अपघातांची संख्या वाढतच चालली आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सध्या महामार्ग विभागाने यावर काटेकर लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे.