समुद्रस्नानाचा लुटला आनंद
| कोर्लई | प्रतिनिधी |
पर्यटनात जगाच्या पटलावर नावारूपाला आलेल्या मुरुड तालुक्यातील प्रसिद्ध काशीद बीचवर जून महिन्याच्या पहिल्या विकेंडला रविवारी सकाळच्या वेळी पर्यटकांची गर्दी पाहावयास मिळाली होती. वाढलेल्या उष्णतेमुळे हैराण झालेले पर्यटक समुद्रात पोहण्याचा मनसोक्त आनंद घेत असल्याचे दिसून आले. काशिद-बिच समुद्र किनारा भरतीच्या वेळेस फेसाळणारे पाणी, उसळणाऱ्या लाटा, किनाऱ्यावरील शुभ्र वाळू येथे पर्यटकांना आकर्षित करते. पर्यटकांच्या सोयी-सुविधात याठिकाणी असलेली स्पीडबोट, बनाना, बंफर तसेच घोडा-उंटावरील सफर पर्यटनाचा आनंद द्विगुणीत करते. याचा पर्यटक मनसोक्त आनंद लुटत होते.
याठिकाणी विविध खाद्य-पेय चहा-नाष्टा सोयी सुविधा उपलब्ध आहेत. याठिकाणी दर शनिवार, रविवार तसेच सुटीच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर पर्यटक भेट देत असतात. रस्त्यावर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. वेळप्रसंगी ट्रँफिक जँमलाही सामोरे जावे लागते. देश-विदेशातील पर्यटक देखील आवर्जून भेट देत असतात. यामुळे काशिदबीचला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. पावसाळा अद्याप सुरु झाला नसला तरी जून महिन्याच्या पहिल्या विकेंडला रविवारी सकाळच्या वेळी प्रचंड उकाड्यामुळे पर्यटकांनी काशिद बीचवर पोहण्याचा मनसोक्त आनंद लुटला.
