पर्यटनवाढीला मिळणार चालना
। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
केंद्र सरकारपाठोपाठ राज्य सरकारनेही सागरी पर्यटनवाढीवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यानुसार यंदाच्या अर्थसंकल्पात तरतुदीही करण्यात आल्या आहेत. या अंतर्गतच आता रत्नागिरी जिल्ह्यातील सागरी पर्यटनाला चालना देण्यासाठी क्रूझ टर्मिनल उभारले जाणार आहे. यासाठी राज्य शासन स्तरावरून प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.
निसर्ग सौंदर्याने नटलेल्या कोकणात पर्यटन विकासाच्या माध्यमातून रत्नागिरी येथे क्रूझ टर्मिनल उभारण्यात येत आहे. रत्नागिरीमधील विमानतळासाठी 147 कोटींचा निधी देऊन क्रूझ टर्मिनलचे काम मार्गी लावण्यात येत आहे. यातून रत्नागिरीतील विमानतळाच्या प्रवासी वाहतूक टर्मिनलचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी आवश्यक असणार्या जागेचेही भूसंपादन झाले असून प्रवासी टर्मिनलचे काम वेगाने सुरू करण्यात आले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटनवाढीच्या दृष्टीने विशेषत: सागरी पर्यटनवाढीला मोठा वाव मिळणार आहे. त्यामुळे या ठिकाणी क्रूझ टर्मिनलही मंजूर झाले आहे. याचे कामही लवकरच सुरू होणार असल्याची माहिती मिळत आहे. केंद्र शासनाने पर्यटनवाढीवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. राज्य शासनाच्या पर्यटनवाढीच्या धोरणामुळे रत्नागिरीसह गणपतीपुळे येथे धार्मिक पर्यटनाबरोबरच दापोली, गुहागरच्या सागरी किनार्यांच्या पर्यटनवाढीला अधिक चालना मिळणार आहे.