विकास कामांत करोडो रुपयांचा चुराडा
। माथेरान । वार्ताहर ।
रायगड जिल्ह्यातील माथेरान या पर्यटनस्थळासाठी आजवरच्या कार्यकाळात करोडोंचा निधी उपलब्ध झाला होता. याच निधीच्या माध्यमातून हे नयनरम्य पर्यटनस्थळ विकसनशील होणे अपेक्षित होते. परंतु, आलेल्या निधीचा सदुपयोग न केल्यामुळेच आजही केलेली बहुतांश कामे अत्यंत निकृष्ट झालेली आहेत, तर काही कामे अल्पावधीतच उपयोगाविना पडून आहेत.
काही वर्षांपूर्वी जवळपास 125 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला होता. यामध्ये नेरळ माथेरान घाटरस्ता, माथेरानचा मुख्य रस्ता आणि महत्वाच्या पॉईंट्सच्या सुशोभीकरणासाठी खर्च करण्यात आला होता. मुख्यत्वे जी काही लोकाभिमुख पर्यटकांना सेवासुविधा निर्माण करणारी कामे होती त्याकडे नगरपरिषदेच्या माध्यमातून करडी नजर ठेवून सर्व कामे उत्तम दर्जाची करून घेणे अपेक्षित होते. परंतु संबंधित अधिकारीवर्गाने ठेकेदाराच्या आणि स्वतःच्या फायद्यासाठी हेतुपुरस्सर दुर्लक्ष केल्यामुळे बहुतांश कामे तकलादू झालेली आहेत.
पर्यटकांसाठी एक नाविन्यपूर्ण आकाशगंगा प्रकल्प उभयारण्यात आला होता. तोसुध्दा मागील पाच ते सहा वर्षांपासून बंद आहे. पावसाळ्यात महत्त्वाच्या भागात मातीची धूप होऊ नये यासाठी धूप प्रतिबंधक जाळ्या बसविण्यात आल्या होत्या. त्या जाळ्या अत्यंत निकृष्ट दर्जाच्या असल्यामुळे या कामावरसुध्दा लाखो रुपये खर्च करण्यात आले होते, ते गंगाजळीत गेले आहेत. घनकचरा व्यवस्थापन कामासाठी दरवर्षी कोटी रुपये खर्च केले जातात. काही ठिकाणी मोबाईल टॉयलेट उभारली आहेत. ती नियमितपणे स्वच्छ ठेवली जात नसल्याने पर्यटकांना विशेषतः महिला पर्यटकांना खूपच त्रासदायक ठरत आहे. नगरपरिषदेचे कंपाऊंड, प्राथमिक शाळा त्याचप्रमाणे हुतात्मा स्मारक येथे बांधण्यात आलेल्या जांभ्या दगडातील भिंतीला लावण्यात आलेल्या तारेच्या संरक्षक जाळ्या निखळून पडल्या आहेत. शाळेच्या प्रांगणाजवळ असलेले लोखंडी गेटसुध्दा उन्मळून पडले आहे. अत्यावश्यक सेवा उपलब्ध करून देणार्या नगरपरिषदेच्या दवाखान्यात दानशूर व्यक्तींनी दिलेले लाखो रुपये किंमतीचे साहित्य धूळ खात पडून आहे. मुख्य रस्त्यासाठी लागणारे क्ले पेव्हर ब्लॉक हे उत्तम दर्जाचे आहेत की नाही, याची शहानिशा न करता कामांचा सपाटा सुरू ठेवल्यामुळे काही ठिकाणी कच्च्या ब्लॉकमुळे रस्त्यांना खड्डे पडले आहेत. अशाप्रकारे अनेक ठिकाणी तकलादू कामे केवळ ठेकेदारांना पोसण्यासाठीच आणि स्वतःच्या लाभासाठी पूर्ण केली असल्याने शासनाच्या करोडो रुपयांचा चुराडा झालेला दिसून येत आहे. याबाबत स्थानिक मंडळी नेहमीच चर्चा करत आहेत की, कुठे नेऊन ठेवले आहे माथेरानला! निदान यापुढे तरी शासनाच्या निधीचा सदुपयोग करून या गावाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी सुज्ञ लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावेत, असे सूर ऐकावयास मिळत आहेत.
