| रायगड | आविष्कार देसाई |
नुकतीच दर्श अमावस्या होऊन गेली आहे. मात्र याच रात्री हार, नारळ, टाचण्या टोचलेले लिंबू, काळी बाहुली, दही-भात असा उतारा तीन तिकटींवर (तीन रस्ता) टाकल्याचे चित्र पुरोगामी महाराष्ट्रात पहायला मिळत आहे. आपल्या देशाचे चांद्रयान चांदोमामाच्या दिशेने झेपावले आहे, असे असतानाच देशातील जनता मात्र अंधश्रद्धेच्या आहारी गेल्याचे दुर्दैवी चित्र दिसत आहे.
अमावस्या म्हटले की, प्रत्येकाच्या मनात भूत-प्रेत हेच येते. थरकाप उडवणारा काळोख आणि कुठेतरी दूरवर कुत्र्याचे भुंकणे हे ओघाने आलेच. या कालावधीत भूत कमालीचे सक्रिय असतात, असे विविध मांत्रिक अथवा काळी जादू करणारे सांगतात. या मांत्रिकांकडे भूतबाधा उतरण्याची कला असते, असे बोलले जाते.
एखाद्याला भूतबाधा झाली असेल तर हे मांत्रिक चुटकीसरशी ती दुर करतात. यासाठी त्यांना हळद-कुंकू, काळी बाहुली, तीन धारी लिंबू त्याला टोचण्यासाठी टाचण्या, दही-भात असा उतारा लागतो. हा उतारा तीन रस्ते (तीन तिट्यावर) एकत्र येतात त्या ठिकाणी टाकला जातो. त्या नंतरच भूतबाधा कायमची नष्ट होते, असे ते सांगायला विसरत नाहीत. नुकतीच दर्श अमावस्या पार पडली आहे. त्या रात्री असे बरेच अंधश्रेध्देचे प्रकार जिल्ह्याच्या विविध भागात झाले असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. अलिबाग शहरातील अशा बहुतांश तीन तिकटींवर नारळ फुटलेले, लिंबू फेकलेले अथवा उतारा टाकल्याचे दिसून आले. रस्त्याच्या मध्ये असे भयानक प्रकार झाल्याने येणारे-जाणारे नागरीक भयभीत होऊन त्याकडे पहात दुरुनच जाणे पसंत करत होते. शहरामध्ये असे चित्र असेल तर, ग्रामीण भागामध्ये काय परिस्थिती असेल.
असले प्रकार जादुटोण्याचेच भाग असतानाही याबाबत गुन्हा कोण दाखल करणार आणि कोणावर करणार असा प्रश्न आहे. मिळालेल्या माहिती नुसार रायगड जिल्ह्यामध्ये 2020-21 या कालावधीत जादुटोणा विधेयकानुसार एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर गुन्ह्याची नोंद नसल्याची माहिती मिळते.
देश आपला चांद्रयान मोहीम आखण्यात व्यस्थ आहे. नुकतेच चांद्रयान चांदोमामाच्या दिशेने झेपावले आहे. एवढे प्रगत असताना देखील आपण अंधश्रध्देला बळी पडतो. हे दुर्देवी म्हणावे लागेल. अशाच अंधश्रद्धेला आळा घालण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यानी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कायदा अमलात यावा यासाठी कायदा केला जावा म्हणून सुमारे सोळा वर्षे संघर्ष केला. त्यांच्या मागणीनुसार सरकारने विधेयक तयार केले आणि ते विधेयक विधिमंडळात मंजुरीसाठी मांडण्यात आले. पण तेथे ते चौदा वर्षे अडकले होते. जेव्हा दाभोलकर यांची अत्यंत अमानुष हत्या झाली. त्याच्या दुसऱ्या दिवशी घाईघाईने सरकारने तो कायदा वटहुकूम काढून अंमलात आणला आहे.
अंधश्रध्दा विरोधी विधेयकाच्या अनेक संज्ञा-शब्द बदलले, ढाचा बदलला, काही कलमांची छाटाछाट झाली. मूळ विधेयकाचे नामकरण अंधश्रध्दाऐवजी जादूटोणा विरोधी असे करण्यात आले. 13 डिसेंबर 2013 ला विधानसभेत तर 18 डिसेंबर 2013 ला विधान परिषदेत हा अध्यादेश पास होऊन आता तो कायदा म्हणून अस्तित्वात आला. अशा प्रकारचा कायदा करणारे महाराष्ट्र हे भारतातले पहिले राज्य ठरले.
आपण पुरोगामी विचारांचे असल्याचे सांगत असतो. मात्र अशा प्रकारे आपण विचाराने किती मागासलेले आहोत हे दिसून येते. पूर्वी विज्ञानाचे पुरावे सापडत नव्हते तो पर्यंत ठिक होते आता विज्ञानाचे पुरावे उपलब्ध आहेत. परंतु अंधश्रध्देला कोणतेच पुरावे नसतात. शाळांमध्ये विज्ञानाच्या अॅक्टीव्हीटी (क्रीयाकलाप) जास्त प्रमाणात पोचल्या पाहिजेत. त्यावेळी आपल्या या पिढीला विज्ञानवादी विचार काय आहेत ते समजेल आणि अशा घटना घडण्याचे प्रकार थांबतील.
संदीप वारगे, कोकण विभाग समन्वयक( डॉ. ए.पी.जे कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन, रामेश्वरम)