| अलिबाग | प्रतिनिधी |
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवन्नोत्ती अभियान अंतर्गत उमेद महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटनेच्यावतीने गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित मागण्यांसाठी शासन दरबारी पाठपुरावा करण्यात आला आहे. मात्र अजूनही त्याची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे उमेद महिला, कर्मचारी आपल्या न्याय हक्कासाठी आंदोलनाच्या तयारीत आहेत. याबाबत जिल्हा तालुका स्तरावर जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत समिती गट विकास अधिकारी यांना निवेदन दिले जाणार असल्याची माहिती जिल्हा सचिव चित्रांगी म्हात्रे यांनी दिली.
महिलांना व्यावसायिक बनविण्याबरोबरच त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम ठेवण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवन्नोती अभियानंतर्गत रायगड जिल्ह्यात महिला बचत गट तयार करण्यात आले. उमेदच्या माध्यमातून गावे, वाड्यांमधील महिलांना एकत्र करून त्यांना शासकिय योजनांची माहिती देणे. योजनांचा लाभ मिळवून देणे. बँकाकडून सहाय्य मिळवून देणे. जॉब कार्ड काढून देणे अशा अनेक प्रकारची कामे करीत असताना, महिलांना स्वावलंबी बनविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. जिल्ह्यात हजारो महिला या माध्यमातून काम करीत आहेत. रात्रीचा दिवस करून काम करणाऱ्या या महिलांना तुटपुंज्या वेतनावरच कुटूंबाचा उदरनिर्वाह चालवावा लागत आहे. शासनाकडे वारंवार विनंती करून निवेदन दिले आहेत. मात्र शासनाकडून कोणतीही ठोस भुमिका घेतली नाही. त्यामुळे उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटनेच्याद्वारे मागण्यांसाठी आंदोलन केले जाणार आहे. उमेदमध्ये काम करणाऱ्या सर्व समुदाय संसाधन व्यक्तींना रोजगार हमी कायद्याप्रमाणे मासिक किमान दहा हजार रुपये पर्यंत मानधन वाढ करणे. दर महिन्याच्या सात तारखेपर्यंत मानधन वितरीत करणे. उपजिवीका निधी वळेत उपलब्ध करून देणे. उमेद एम.एस. आर. एल. एमच्या मनुष्यबळ संसाधन मार्गदर्शक सुचनेनुसार पुर्ववत नवीन पदासाठी भरती प्रक्रीया राबविण्या यावी. अभियनातील सर्व कर्मचाऱ्यांना 50 टक्के मानधन वाढ व स्वतंत्र फेडर निर्माण करून वयाच्या 58 वर्षापर्यंत सेवेची हमी द्यावी. उमेद अभियानातंर्गत कार्यरत प्रभाग समन्वयक व सहाय्यक कर्मचारी यांच्या विनंतीनुसार, जिल्ह्याबाहेर व जिल्हा अंतर्गत बदली व किमान वेतन कायद्यानुसार वेतन वाढ देण्यात यावी या मागण्यांसाठी आंदोलन केले जाणार आहे. त्याची तयारी जोरात सुरु केली असून आपल्या न्याय हक्कासाठी हा लढा असणार असल्याचे चित्रांगी म्हात्रे यांनी सांगितले.