| पनवेल | प्रतिनिधी ।
पॉलिसीचे अडकलेले पैसे आणि परतावा मिळवून देण्याच्या बहाण्याने एका सायबर टोळीने कामोठ्यातील एका 52 वर्षीय व्यक्तीला तब्बल 6 लाख 10 हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कामोठे पोलिसांनी या प्रकरणातील सायबर चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरु केला आहे.
या प्रकरणातील तक्रारदार राजीव चव्हाण (52) हे कामोठे सेक्टर 21 मध्ये राहण्यास असून, ते तळोजा एमआयडीसी येथील एका नामांकित कंपनीत नोकरी करतात. 2016 मध्ये त्यांनी घेतलेल्या क्रेडिट कार्डसोबत त्यांना एक इन्शुरन्स पॉलिसी मिळाली होती, चव्हाण यांनी त्या पॉलिसीचा फक्त पहिला हप्ता भरला होता. याचीच माहिती मिळवून एका सायबर टोळीने वर्षभरापूर्वी आशिष गिडवानी नावाने चव्हाण यांना संपर्क साधला होता. तसेच, चव्हाण यांना जुन्या पॉलिसीचे पैसे मिळवून देण्याच्या बहाण्याने त्यांना श्रीराम लाईफ इन्शुरन्सच्या दोन नवीन पॉलिसी काढण्यास भाग पाडले होते. या पॉलिसीचे दोन हप्ते भरल्यानंतर गिडवाणी नावाच्या सायबर चोरट्याने आपला फोन बंद केला. त्यानंतर जुलै 2025 मध्ये विकास गर्ग नावाच्या दुसऱ्या सायबर चोरट्याने चव्हाण यांना फोन करून त्यांचे श्रीराम लाईफ पॉलिसीचे पैसे काढून देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर त्या सायबर चोरट्याने सदर केस ‘इन्शुरन्स अधिकारी’ राजीव मनोत्रा आणि सतवीर चव्हाण यांच्याकडे वर्ग केल्याचे भासवले. त्यावेळी सायबर चोरट्यांनी चव्हाण याना एकूण 13 लाख 78 हजार 555 रुपये मिळणार असल्याचा विश्वास दिला. मात्र, सदर रक्कम खात्यात जमा करण्याच्या बहाण्याने चव्हाण यांच्याकडे वेगवेगळ्या टप्प्यांत पैशांची मागणी केली.
अशा पद्धतीने सायबर टोळीने चव्हाण यांच्याकडून 6 लाख 10 हजार रुपये उकळल्यानंतर त्यांनी आपले फोन बंद केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच चव्हाण यांनी सुरुवातीला राष्ट्रीय सायबर पोर्टलवर ऑनलाईन तक्रार नोंदवली आणि त्यानंतर कामोठे पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानुसार कामोठे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच सायबर टोळीचा शोध सुरु केला आहे.
सायबर चोरट्यांनी घातला सहा लाखांचा गंडा
