सायबर आघात

सायबर गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. सध्या खेड्यातील दुकानांमधून देखील मोबाईलवरील जीपे किंवा अन्य यूपीआय माध्यमांमधून पैसे देणे लोकांना सोईचे वाटू लागले आहे. मात्र त्यामुळे त्याच्याशी संबंधित गुन्हेगारांचाही सुळसुळाट झाला आहे. इंटरनेटचा प्रसार आणि अगदी तरुण मुलामुलींच्या हातात पोचलेले मोबाईल फोन्स यामुळे या गुन्ह्यांना वाव मिळतो आहे. त्यातच केंद्र सरकारच्या अट्ट्हासामुळे आधार, पॅनकार्ड इत्यादी सर्व ओळखपत्रे एकमेकांना जोडली गेल्याने लोकांची अत्यंत वैयक्तिक माहिती ही सहज कोणालाही उपलब्ध होऊ लागली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या तीस एप्रिलला होणार्‍या परिक्षेची प्रवेशपत्रे टेलिग्राम या समाजमाध्यम फलाटावर उपलब्ध झाल्याने रविवारी एकच खळबळ माजली. सुमारे नव्वद हजार उमेदवारांची प्रवेशपत्रे येथे दिसत असल्याने त्यांची अन्य माहिती व परिक्षेच्या प्रश्‍नपत्रिकाही फुटल्याच्या बातम्या पसरल्या. परिक्षेची प्रवेशपत्रे ही वैयक्तिक त्या त्या उमेदवारांनाच मिळायला हवीत. ती इतक्या संख्येने सार्वजनिक करू शकणारा जो कोणी गुन्हेगार आहे तो आयोगाच्या प्रश्‍नपत्रिकाही सहज फोडू शकेल असे उमेदवार विद्यार्थ्यांना वाटले तर त्यांना दोष देता येऊ शकणार नाही. तूर्तास आयोगाने या शक्यतेचे खंडन करून परीक्षा वेळेवरच होणार असल्याचे जाहीर केले असले तरी तरुणांच्या मनात धाकधूक व शंका कायम राहणे साहजिक आहे. गेल्या काही काळात आयोगाच्या परिक्षा विविध कारणांनी ऐन वेळेस रद्द झाल्या आहेत. आयोगाचे किंवा इतर महत्वाच्या परिक्षांचे पेपर फुटण्याच्या घटनाही दुर्मिळ नाहीत. शंभर किंवा हजार जागांसाठी लाखो विद्यार्थी या परिक्षा देत असतात. म्हणजेच लाखो कुटुंबांचा जीव त्यात टांगणीला लागलेला असतो. अनेक विद्यार्थी ऐन तारुण्यातली बहुमोल अशी सात-आठ वर्षे यापायी वाया घालवतात. त्यामुळे केवळ प्रवेशपत्रेच फुटली आहेत प्रश्‍नपत्रिका नव्हे हे या विद्यार्थ्यांचे सांत्वन होऊ शकत नाही. हा प्रकार आयोगाने व सरकारने गांभीर्याने घ्यायला हवा. सायबरद्वारे होणारा हा घात पेलवणे सर्वांनाच जमणार नाही. यात काहींची आयुष्येही उद्धवस्त होऊ शकतात. तंत्रज्ञान आता इतके पुढे गेले आहे की, बनावट आधारकार्डे तयार करता येऊ शकतात हे अनेकदा दिसले आहे. त्यामुळे, काल फुटलेल्या माहितीच्या आधारे बनावट प्रवेशपत्रे तयार केली जाऊन परिक्षेमध्ये गैरव्यवहार तर होणार नाहीत, अशी शंका कोणाच्या मनात आली तर ते चूक म्हणता येणार नाही. आयोगाने रविवारी तात्काळ काही खुलासे केले हे ठीक झाले. पण, इतक्या झटपट आयोग चौकशी करून कोणत्याही निष्कर्षापर्यंत कसा पोचला असा सवाल काही विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे. त्यांचे परिक्षेपूर्वी निरसन करणे आवश्यक आहे. याबाबत वृत्तवाहिन्यांनीही आपल्या उत्साहाला आवर घालायला हवा. काही वृत्तवाहिन्या रविवारी बराच काळ प्रश्‍नपत्रिका फुटल्याचा संशय व्यक्त करीत होत्या. परिक्षा अवघी सहा दिवसांवर आलेली असतानाच्या सायबर आघातात विनाकारण भर घालणे हेही गुन्हेगारी कृत्यच म्हणावे लागेल.

Exit mobile version