| पनवेल | प्रतिनिधी |
शहरातील लक्ष्मी वसाहत झोपडपट्टी परिसरात सकाळी सिलिंडरला लागलेल्या आगीमुळे मोठी खळबळ उडाली. सुदैवाने, अग्निशमन दलाने योग्य वेळी घटनास्थळी धाव घेतली आणि आगीवर नियंत्रण मिळविले. त्यामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला.
आगीची माहिती मिळताच माजी नगरसेविक दर्शन भोंईर यांनी महापालिकेच्या अग्निशमन दलाला तत्काळ कळविले. त्यानंतर अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग विजवली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. गॅस सिलिंडरमधून झालेल्या गळतीमुळे ही आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे आग शेजारील घरांपर्यंत पसरली नाही. पनवेल महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून, भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी परिसरात सुरक्षेचे उपाय वाढवले जाणार आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्यामुळे नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.







