| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल परिसरातील शहराची उभारणी करण्यात महत्वाची संस्था मानल्या जाणाऱ्या सिडकोच्यावतीने पनवेल, खारघर, उलवे, तळोजा अशा विविध ठिकाणी 1 लाख सदनिकांची उभारणी केली आहे. मात्र, या स्वप्नपूर्तीच्या घरातील पायाभूत सुविधांचा अभाव दिसू लागला आहे. ऐन दिवाळीत पनवेल परिसरातील नागरिकांना पाण्यापासून वंचित राहावे लागल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
सिडकोच्यावतीने पनवेलसह खारघर, कळंबोली, कामोठे, तळोजा, उलवे या परिसरात 1 लाख घरांची उभारणी केली आहे. याच सिडकोने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारणीत महत्वाची भूमिका बजावली आहे. येत्या काळात आणखी 1 लाख घरांची उभारणी करण्याचा सिडकोचा मानस आहे. त्यामध्ये खारघर येथे 50 हजार घरे, तळोजामध्ये 25 हजार, कळंबोली मध्ये 10 हजार तर उलवे येथे 15 हजार सदनिका यांचा समावेश आहे. असे असले तरी आता बांधण्यात आलेल्या घरांमध्ये मात्र पायाभूत सुविधांचा अभाव दिसू लागला आहे. ऐन दसरा-दिवाळीच्या दिवसात या घरातील नागरिकांना पाणी पुरवठा होत नसल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले. त्यांना दुसऱ्यांच्या घरी जाऊन पाणी आणण्याची नामुष्की ओढावत आहे. यंदा एवढा पाऊस पडला असून, त्या पाण्याचे सिडकोने काय केले? सिडको हे पाणी नक्कीच इतर बांधकाम व्यवसायिकांना विकत असणार, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे. तसेच, ही स्वप्नपूर्तीची घरे म्हणून देण्यात आली होती. सर्वांनी कर्ज काढून घरे घेतली. करारामध्ये 24 तास पाणीपुरवठा असणार, असे नमूद करण्यात आले होते. परंतु, ऐन दिवाळीत देखील पाणी नव्हते. त्यामुळे सिडकोला जर स्वप्नपूर्ती करायची असेल तर पाणीपुरवठा करावा, असे देखील नागरिकांनी सांगितले.







