| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
पनवेल महानगरपालिकेच्या लोकनेते दि.बा पाटील शाळा क्र. 1 मध्ये दिनांक 9 ऑगस्ट रोजी केंद्रस्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत पनवेल महानगर पालिकेच्या सर्व शाळांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला. आयुक्त श्री.गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या दहा शाळांमध्ये केंद्रस्तरावरती वर्षभरात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत असते. यामधीलच ही एक स्पर्धा असून या चित्रकला स्पर्धेमध्ये महापालिकेच्या 10 शाळांमधून सुमारे 135 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
या स्पर्धेमध्ये इयत्ता 1ली ते 2 री वर्गासाठी रंगभरण, इयत्ता 3 रीव 4 थी वर्गासाठी निसर्ग चित्र व पावसात भिजणारी मुले,इयत्ता 5वी ते 7वी वर्गासाठी लोकमान्य टिळक व्यक्तीचित्र, प्रदूषण मुक्त पृथ्वी असे विविध विषय देण्यात आले होते. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झालेल्या या स्पर्धेस पनवेल महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचे अतिरिक्त आयुक्त भारत राठोड व सहाय्यक आयुक्त सुवर्णा दखणे यांनी स्पर्धेनिमित्ताने विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच प्रशासन उपधिकारी किर्ती महाजन यांनी भेट देऊन मुलांना मार्गदर्शन केले. तसेच लोकनेते दि.बा. पाटील शाळेच्या मुख्याध्यापिकाअनुपमा डामरे यांनी मुलांना शुभेच्छा दिल्या. यावेळी सर्व शाळेच्या मुख्याध्यापिका व शिक्षक उपस्थित हेाते.