दस्तुरी नाक्यावर घोडेवाल्याची दादागिरी

पोलीस ठाण्यात अदखल पात्र गुन्हा दाखल
। नेरळ । प्रतिनिधी ।
पर्यटनस्थळ माथेरानचे प्रवेशद्वार असलेल्या दस्तुरी येथील वाहनतळात अवैधरित्या घोड्यावर पर्यटक बसविण्यावरून घोडे चालक आणि कर संकलन करणार्‍या कर्मचार्‍यां सोबत शाब्दिक चकमक झाली. यामध्ये घोडेवाल्याने दादागिरीची वर्तणूक करून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. अशी फिर्यादीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याने पोलिसांनी त्या घोडेचालकावर अदखल पात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, नगरपरिषद कर संकलनाचा ठेका घेतलेल्या ठेकेदारकडे दत्ता सुतार हे वाहनतळात पर्यायी मार्ग असलेल्या नो पार्किंग गेट जवळ काम करत असताना येथील घोडेवाल्याने दिव्यांग पर्यटक असल्याचे सांगत त्याला वाहनतळातुन घोड्यावर बसवून नेतो असेही सांगितले. यावर दत्ता सुतार यांनी दिव्यांग पर्यटकांसाठी घोडा वाहतळात नेण्याची सूट दिली. मात्र घोडेवाल्याने त्या सगळ्या परिवाराला घोड्यावर बसविले. यावर दत्ता सुतार यांनी दिव्यांग व्यक्तीचा घोडा सोडून इतरांना खाली उतरवून व मुख्य प्रवेशद्वाराने या पर्यटकांना नेऊन त्यांची थर्मल स्क्रीनिग व ऑक्सिजन लेव्हल तपासून त्यांना मुख्य रस्त्यावरुन घोड्यावर बसविण्यास सांगितले. यामुळे घोडेवाल्याचा संताप अनावर झाल्यामुळे त्या दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. या शाब्दिक चकमकीचे गांभीर्य ओळखून दत्ता सुतार यांनी काही वेळातच पोलीस ठाणे गाठले व सदर घोडेवाल्याची रितसर तक्रार केली. पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार नारायण बार्शी यांनी अदखल पात्र गुन्ह्याची नोंद करून घेतली.

Exit mobile version