भुयारी मार्गामुळे शेतीची हानी

उपाययोजना करण्यास प्रशासनाची टाळा-टाळ, शेतकरी कुटुंबाचा आत्मदहनाचा इशारा

| पोलादपूर | प्रतिनिधी |
राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाचा वेग अतिशय संथ असताना पोलादपूर तालुक्यातील कातळी गावातील कशेडी घाटाला पर्यायी भुयारी मार्गाचे कामही अतिशय मंदगतीने सुरू आहे. या कामादरम्यान, कातळी येथील नदीचे पात्र अ‍ॅप्रोच रोडचा भराव नदीच्या दोन पात्रांपैकी एका प्रवाहाला पूर्णपणे बंद करणारा ठरल्याने एका शेतकरी कुटुंबाच्या शेतजमिनीतील माती बांधबंदिस्ती असे सुमारे 25 गुंठ्याचे क्षेत्र वाहून गेले आहे. यासंदर्भात न्यायासाठी पाठपुरावा करूनही कोणतीही भरपाई आणि कायमस्वरूपी उपाययोजना प्रशासन आणि एसडीपीएल कंपनीकडून टाळण्यात आली आहे. तब्बल दोन-तीन वर्षे शेतीपासून वंचित राहिल्याने हलाखीचे जीवन जगण्याची वेळ ओढविलेल्या शेतकरी कुटुंबाने पोलादपूर तहसील कार्यालय अथवा आपल्या वाहून गेलेल्या जमिनीवर सामुदायिक आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.

2019 पासून भुयारी मार्गाचे काम सुरू झाल्यानंतर भुयारातून उपसलेले दगड भुयारालगतच्या पहिल्या पुलाच्या अ‍ॅप्रोच रोडच्या भरावसाठी टाकण्यात आल्याने ओहोळाचे पात्र बंद होऊन नदीच्या पात्राला हा पाण्याचा प्रवाह वेगाने मिळण्यासाठी वाहू लागला. यामुळे 2021 मध्ये अतिवृष्टीमुळे कातळीतील शेतकरी कुटुंब सुरेश गोविंद पवार आणि आशा नथुराम पवार यांच्या मिळकतींतील शेतजमिनीपैकी साधारणपणे 25 गुंठ्याच्या क्षेत्रातील तीन खाचरांतील सुपीक माती वाहून गेली. गेल्या तीन वर्षांपासून पवार कुटुंबिय याठिकाणी शेती करू शकले नसल्याने रोजच्या जेवणातील भाताचे तांदूळही विकत घ्यावे लागल्याने शेतकर्‍यांचे नुकसान झाले असून, त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची झाली आहे.

यासंदर्भात, पवार कुटूंबियांनी पोलादपूर तहसिलदार यांच्या कार्यालयात लेखी अर्ज करून तक्रार केली. या तक्रारीच्या प्रती त्यांनी कातळीतील भुयारी मार्गापर्यंत रस्ते व पूल बांधणार्‍या शिंदे डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला प्रत्यक्ष देऊन विनंती केली असता भुयारी मार्गाचे एसडीपीएल कंपनीतर्फे काम पाहणार्‍या अधिकार्‍यांनी शेतीची नुकसान भरपाई देण्याची तयारी दाखवली आणि प्रत्यक्षात तहसिलदार पोलादपूर यांच्या कोर्टात कामकाज सुरू झाल्यानंतर संबंधित एसडीपीएल कंपनीच्या अधिकार्‍यांनी अनुपस्थित राहून अन्य कोणी निर्णयक्षम नसलेला प्रतिनिधी पाठवून निष्काळजीपणा दाखविला. यादरम्यान, पोलादपूर तहसिलदार दिप्ती देसाई यांनीही उपस्थित असलेल्या प्रतिनिधीला मान्यता दर्शवित तक्रारदारांच्या आक्षेपाला महत्त्व न दिल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे.

आमची शेतजमीन पूर्ववत करूनही तसेच नदीपात्रातील भराव काढूनही आमचे नुकसान भरून निघणार नसल्याने न्याय गरीबांसाठी नसल्याच्या भावनेतून आम्ही सर्व पवार कुटुंबियांनी आम्हाला भरपाई न मिळाल्यास पोलादपूर तहसिल कार्यालय अथवा आमच्या जमिनीमध्ये आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या यापूर्वीच्या पत्रव्यवहारामध्ये आत्मदहनाचा इशारा असूनही आम्हाला कोणतीही भरपाई न देता परस्पर शिंदे डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडसमोर न्यायालयीन लढाई करण्यास सुचविले आहे. जे आमच्या कुवतीबाहेर असल्याने या आत्मदहनाच्या निर्णयाप्रत आम्ही पवार कुटुंबिय आल्याचे या शेतकरी कुटुंबाचे म्हणणे आहे.

Exit mobile version