वनसंपत्तीचे मोठे नुकसान; पशु-पक्ष्यांच्या अधिवासावरही परिणाम
| महाड | प्रतिनिधी |
उन्हाळ्याच्या तीव्र झळांमध्ये महाड तालुक्यात डोंगर-दऱ्यांमध्ये लागणाऱ्या वणव्यांची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. वाढत्या तापमानासोबतच कोरडी झालेली वनराई आणि पानगळ यामुळे वणव्यांना अधिक खतपाणी मिळत असून, याचा मोठा फटका पर्यावरणाला बसत आहे. वणव्यांमुळे अनेक वर्षे जुनी असलेली मोठमोठी झाडे जळून खाक होत असून वनसंपत्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
वनव्यांचा परिणाम केवळ झाडांपुरता मर्यादित नसून जंगली प्राणी आणि पक्ष्यांच्या अधिवासावरही होत आहे. आगीमुळे प्राण्यांना स्थलांतर करावे लागत असून काही वेळा त्यांचा मृत्यूही होतो. परिणामी पर्यावरणीय संतुलन बिघडण्याचा धोका निर्माण झाला आहे. याशिवाय, वणवे हे कोकणातील वाढत्या तापमानासाठीही काही प्रमाणात कारणीभूत ठरत असल्याचे पर्यावरण अभ्यासकांचे मत आहे.
दरम्यान, अनेक ठिकाणी वणवे हे नैसर्गिक नसून मानवनिर्मित असल्याचेही निदर्शनास येत आहे. काहीजणांकडून जाणीवपूर्वक किंवा निष्काळजीपणामुळे लावल्या जाणाऱ्या आगींमुळे परिस्थिती अधिकच बिकट होत आहे. या प्रकारांना आळा घालण्यासाठी वनविभागाने कठोर उपाययोजना करणे गरजेचे असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
एप्रिल आणि मे महिन्यांत झाडांची मोठ्या प्रमाणात पानगळ होते. या पानांचा जमिनीवर एक संरक्षक थर तयार होतो. पावसाळ्यात पडणारे पाणी या थरामुळे थेट जमिनीवर आदळत नाही आणि त्यामुळे मातीची धूप कमी होते. मात्र वणव्यांमुळे हा पाचोळा जळून नष्ट होत असल्याने पावसाचे पाणी थेट जमिनीतील भेगांमध्ये झिरपत जाते. यामुळे डोंगरदरडी कोसळण्याचा धोका वाढतो.
महाड तालुक्यात मागील काही वर्षांत दरडी कोसळण्याच्या अनेक दुर्दैवी घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर दरडी रोखण्यासाठी वृक्षतोडीवर नियंत्रण ठेवण्यासोबतच वणवे थांबवणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. मात्र तरी सुद्धा वनखात्याचे अधिकारी पर्यावरणप्रेमी तरुणांना एकत्र करून यावर काहीतरी उपाययोजना करणेही योग्य ठरेल. परंतु, ते कधी होईल हाच खरा प्रश्न आहे.
वणव्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी जनजागृती, कठोर कायदे, तसेच दुर्गम भागांमध्ये प्रभावी गस्त आणि तात्काळ प्रतिसाद यंत्रणा उभारणे ही काळाची गरज बनली आहे. अन्यथा येत्या काळात पर्यावरणीय संकट अधिक गडद होण्याची भीती आहे.
– डॉ. राहुल वारंगे, अध्यक्ष, सह्याद्री मित्र संस्था
