चिर्ले-दास्तान फाट्यावर अपघाताचा धोका

। उरण । वार्ताहर ।

उरण तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत असणार्‍या दास्तान फाटा मार्गावर जोरदार पाऊस आणि अवजड वाहतुकीमुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. मोठ-मोठे खड्डे निर्माण होऊन रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. या खड्ड्यांमुळे रस्ते धोकादायक बनले असून अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

जेएनपीए बंदराच्या अनुषंगाने आयात-निर्यातीसाठी तालुक्यातील अनेक गावांत मोठमोठी गोदामे, एमटी यार्ड उभारले आहेत. त्यामुळे या गोदामात येणार्‍या मालाचे अवजड कंटेनर, ट्रेलरच्या वाहतुकीमुळेच रस्ता खराब होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून ठेकेदारामार्फत उन्हाळ्यात चिर्ले येथील रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली होती. त्यानंतर पहिल्या पावसातच खड्डे पडायला सुरुवात झाली. त्यात पाणी साचून रस्ता आणखी खराब होऊन मोठाले खड्डे पडले आहेत.

या खड्ड्यातून प्रवास कसा करायचा, असा प्रश्‍न वाहनचालकांना पडला आहे. छोट्या वाहनांसाठी हा रस्ता अधिक धोकादायक बनला आहे. शासनस्तरावर या मार्गाची दखल घेऊन रस्ता नव्याने बनवून मजबुतीकरण करावे, अशी मागणी होत आहे.

चिखलाचा राडा
चिर्ले ते दास्तान दरम्यान रेल्वेच्या पुलाचे काम सुरू आहे. रस्त्यावर माती पसरलेली असते. त्यातच पावसाची संततधार सुरू असल्याने रस्त्यावर चिखलाचा राडा निर्माण झाला आहे. अवजड वाहतुकीमुळे तर रस्ताच शिल्लक राहिला नसल्याची खंत व्यक्त होत आहे.

जोरदार पाऊस पडत असल्याने रस्त्याची दुरुस्ती करता येत नाही. पाऊस थांबल्यावर रस्त्याचे काम मार्गी लावले जाईल.

नरेश पवार,
उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग
Exit mobile version