। मुंबई । प्रतिनिधी ।
राज्याला विकासाच्या दृष्टीने नेण्याची गरज असताना महायुती सरकार फक्त घोषणा करत आहे. सरकारचा विकास हा होर्डिंग्ज, जाहिरात आणि भाषणात दिसत आहे. परंतु, प्रत्यक्ष जनतेपर्यंत विकास पोहचला नाही. विकासासाठी कोणतीही तरतूद, नियोजन सरकार करत नाही. ग्रामीण आणि शहरी भागातील लोकांकडे सरकार दुर्लक्ष करत आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे.
यावेळी ते म्हणाले की, मुंबई, पुणे, संभाजीनगर महानगरपालिकांमध्ये मोठ्या प्रमाणात टीडीआर घोटाळे झाले असून महाराष्ट्र राज्याला विकण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच, धारावीचा विकास करताना पुर्नवसनाच्या नावाखाली विविध जागा अदानीच्या घशात घालण्याचे काम सरकार करत असल्याचा गंभीर आरोपही दानवे यांनी केला आहे. त्याचबरोबर, स्मार्ट सिटी अंतर्गत रखडलेले प्रकल्प, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका, पालिका, नगरपालिका यांमध्ये लोकप्रतिनिधी नसल्यामुळे आयुक्तांचा सुरू असलेले मनमानी कारभार, मुंबई-पुणे रस्त्याची वाहतूक कोंडी, रखडलेला पाणंद रस्ता प्रकल्प, पंतप्रधान आवास योजनेतील अपूर्ण घरकुलाची कामे यावरून दानवे यांनी सरकारच्या कारभारावर टीकास्त्र डागले आहे.