। पुणे । प्रतिनिधी ।
लोहगाव परिसरातील डी. वाय. पाटील महाविद्यालय रस्त्यावर भीषण अपघात घडला आहे. सिमेंट मिक्सरच्या धडकेत एका दुचाकीस्वार महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू झाला. स्वप्नील प्रकाश साळवे (वय 22, रा. भालकुंड, जि. परभणी) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सिमेट मिक्सरचालक वेंकट गुरुप्पा पवार (वय 45, रा. खांदवे निवास, निरगुडी रस्ता, लोहगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्वप्नील साळवे एका महाविद्यालयात ओैषध निर्माण शास्त्र अभ्यासक्रम करत होता. स्वप्नील आणि त्याचे मित्र वाघोली भागात भाडेतत्त्वावर खोली घेऊन राहतात. सोमवारी (दि. 17) सकाळी अकराच्या सुमारास लोहगाव येथील डी. वाय. पाटील महाविद्यालय रस्त्याने निघाला असताना भरधाव सिमेंट मिक्सरने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार साळवे गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर पसार झालेल्या मिक्सरचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.