| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत शहराच्या वैभवात भर घालणारी प्रतिपंढरपूर नगरी उल्हास नदीच्या काठी वसविण्यात आली असून, याठिकाणी 52 फूट उंच कटेवरी हात ठेवून उभी असणारी विठुरायाची सुबम मूर्ती उभी करण्यात आली आहे. करोडो रुपये खर्च करुन ही सुंदर नगरी उभी करण्यात आली असताना रात्रीच्यावेळी वीजपुरवठा खंडित झाल्यावर भगवान विठुरायाची मूर्ती अंधारात गायब होत आहे. अचानक वीजपुरवठा खंडित झाल्यावर आवश्यक ती उपाययोजना करण्यात न नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. कृत्रिम वीजपुरवठ्याची तरतूद असताना ती न करणार्या नगरपरिषदेच्या या अकार्यक्षम कारभाराबाबत संताप व्यक्त होत आहे.
कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी कर्जत शहराच्या वैभवात भर घातली जावी यासाठी उल्हास नदीच्या तीरावर प्रतिपंढरपूर उभारली. त्या माध्यमातून श्री विठ्ठलाची 52 फुटांची मूर्ती आणि सोबत परिसर सुशोभिकरण करण्यासाठी सरकारने लाखो रुपये खर्च केले आहेत. या प्रतिपंढरपूरमुळे कर्जत शहरात पर्यटक तसेच वारकरी यांच्यासाठी हक्काचे ठिकाण निर्माण झाले आहे. त्याचवेळी कर्जत शहरातील नागरिक रात्री उशिरापर्यंत भेट देत असतात. हे स्थळ कर्जत शहराच्या विकासात भर घालणारे असून, वीजपुरवठा खंडित झाल्यावर एक वेगळी बाब प्रथमच समोर आली आहे. करोडो रुपयांचा खर्च करून प्रतिपंढरपूर क्षेत्र विकसित करण्यात आले आहे. त्यामुळे मागील वर्षभरात हजारो लोकांनी या स्थळाला भेटी दिल्या आहेत. त्याचवेळी रात्री उशिरापर्यंत एक हक्काचे ठिकाण म्हणूनदेखील नागरिक या भागात गप्पा मारत बसलेले असतात.
कर्जत शहरात मागील काही दिवस वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे.त्याचा परिणाम विठ्ठलाची मूर्ती आणि प्रतिपंढरपूर परिसरालादेखील बसला आहे. सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यावेळी प्रतिपंढरपूर परिसर अंधारात हरवला होता. विठ्ठलाच्या मूर्तीवर दूरवरून दिव्यांचा प्रकाश पडला होता, मात्र त्या ठिकाणी भेटीसाठी आलेल्या नागरिकांनी वीजपुरवठा खंडित झाल्यावर नाराजी व्यक्त केली. करोडो रुपये खर्च येथील परिसर सुशोभीकरण कामासाठी झाला आहे, असे असताना वीजपुरवठा खंडित झाल्यावर भगवान विठ्ठल अंधारात जाणार नाहीत याचा विचार कर्जत नगरपरिषदेकडून करायला हवा होता. कर्जत नगरपरिषद बांधकाम विभागाने या कामाचे अंदाजपत्रक तयार केले होते, त्यावेळी वीजपुरवठा खंडित झाल्यावर कृत्रिम प्रकाश देण्याची व्यवस्था करण्याचा प्रकार अंतर्भूत करण्याची गरज पालिका बांधकाम अभियंता यांना आवश्यक वाटली नाही काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सर्वत्र इन्व्हर्टर उपलब्ध असताना भगवान विठ्ठलाच्या मूर्तीच्या ठिकाणी कृत्रिम प्रकाशाची व्यवस्था करता येणे शक्य असताना तशी तरतूद करण्यात आलेल्या नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
काही मीटर अंतरावर सोलरचा प्रकाश
कर्जत शहरात ज्यावेळी वीजपुरवठा खंडित होतो, त्यावेळी विठ्ठलाची मूर्ती अंधारात जाते. मात्र, याच विठ्ठलमूर्तीच्या पुढे काही मीटर अंतरावर भजन भूषण गजाननबुवा पाटील स्मारक असून, तेथे सोलर दिवे आहेत. आमदार महेंद्र थोरवे यांच्या कार्यालयाबाहेर सोलर बसविले आहेत. मात्र, विठ्ठलाच्या मूर्तीजवळ सोलर नाहीत, यामुळे हा परिसर अंधारात हरवला जातो.