रायगड जिल्ह्यातील एकाही आमदाराची वर्णी नाही
| आविष्कार देसाई | रायगड |
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध 11 समित्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या. विशेष म्हणजे, यातील एकाही समितीवर रायगड जिल्ह्यातील भाजपाच्या एकाही आमदाराची वर्णी लागलेली नाही. बाहेरुन आलेल्यांना भाजपा महत्त्वाची पदे देत नसल्याची चर्चा असते. ती यानिमित्ताने योग्य असल्याचे दिसते. त्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजीचा सूर असल्याचे चित्र आहे.
राज्यात सत्तास्थापनेपासून महायुती सरकारने मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यातही बराच उशीर केला होता. त्यानंतर पालकमंत्रीपदाचे वाटप करण्यात आले. त्यामध्ये रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. तसेच विविध महामंडळांच्या नियुक्त्याही रखडल्या आहेत. त्यामुळे आगामी कालावधीत एखाद्या महामंडळावर नियुक्ती होण्याची भाबडी आशा रायगडातील भाजपा आमदारांच्या समर्थकांना नसल्यास नवल वाटायला नको.
यावेळी मुख्यमंत्र्यांसह भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि भाजप विधिमंडळ मुख्य प्रतोद रणधीर सावरकर यांच्या संमतीने या समित्यांची नियुक्ती केली आहे.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातील समित्यांचे वाटप अद्याप झाल्याचे दिसत नाही. विधानसभा अध्यक्षांनी विविध समित्यांच्या संदर्भात नव्या नियुक्त्या सर्व पक्षियांकडून होत नसल्याने नाराजी व्यक्त केली होती. तर, मंत्रीपद हुकलेल्या भाजप आमदारांचे समितीच्यामार्फत राजकीय पुनर्वसन केल जाणार आहे. सोबतच ज्येष्ठतेनुसार समित्यांचे वाटप झाल्याचे बोलले जाते. मिळालेल्या माहितीनुसार, भाजपच्या वाट्याला 11 समित्या, तर शिवसेनेच्या वाट्याला सहा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला पाच समित्यांच्या सदस्यांची नियुक्ती होणार असल्याची माहिती मिळत आहे.
रायगड जिल्ह्यात भाजपाचे तीन आमदार निवडून आले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने पनवेल विधानसभेतील आमदार प्रशांत ठाकूर यांचा समावेश होता. आमदार ठाकूर हे चार वेळा निवडून आले आहेत. त्यामध्ये एक टर्म ते काँग्रेसचे आमदार होते. तसेच पेण विधानसभेतील भाजपाचेच आमदार रविंद्र पाटील हे देखील ज्येष्ठ नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी देखील तीन वेळा विधानसभेची निवडणूक जिंकली आहे. त्यामध्ये एक वेळ काँग्रेसकडून आणि दोन वेळ भाजपाकडून आमदार झाले आहेत.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी भाजपाककडून मोठा विजय मिळवला आहे. ते भाजपाच्या सर्व कार्यक्रमात हिरीरीने पुढे असतात. मात्र त्यांना अद्याप राज्यमंत्री, मंत्री केलेले नाही. मध्यंतरी काही कालावधीसाठी त्यांच्याकडे सिडकोचे अध्यक्षपद दिले होते ही बाब वगळता त्यांच्यावर भाजपाने अन्याय केल्याची धारणा त्यांच्या समर्थकांची असल्याचे दिसते. आमदार रविंद्र पाटील हे देखील ज्येष्ठ असताना त्यांनाही वेळोवेळी डावलले असल्याचे लपलेले नाही. उरणमध्ये महेश बालदी हे दुसर्यांदा आमदार झाले आहेत. रायगडात भाजपाचा स्ट्राईक रेट चांगला आहे. आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार रविंद्र पाटील हे काँग्रेस सोडून भाजपामध्ये गेलेले आहेत. बाहेरुन आलेल्यांना भाजपा महत्वाची पदे देत नसल्याची चर्चा असते. ती या निमीत्ताने योग्य असल्याचे दिसते.
दरम्यान, शिवसेना आणि राष्ट्रवादी कांग्रेसकडून अद्यापही विधिमंडळ समितींबाबत घोषणा झालेली नाहीय. तर दोन्ही पक्षांकडून समितींबाबत घोषणा कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विधीमंडळाच्या एकूण 29 समित्या असतात, त्यातील महायुतीच्या फॉर्म्युल्यानुसार भाजपच्या वाटेला 11 समित्या आल्याची सूत्रांची माहिती आहे.
समित्यांवर कोणाची वर्णी
महाराष्ट्र विधिमंडळाच्या सन 2024-2025 या कार्यकाळासाठी सार्वजनिक उपक्रम समितीच्या अध्यक्षपदी पुणे जिल्ह्यातील दौंड मतदारसंघातील भाजपचे नेते राहुल कुल यांची वर्णी लागली आहे. तर पंचायत राज समितीच्या अध्यक्षपदी रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे यांची वर्णी लागली आहे. आश्वासन समितीच्या अध्यक्षपदावर रवी राणा, अनुसूचित जाती कल्याण समितीच्या अध्यक्षपदी नारायण कुचे, अनुसूचित जमाती कल्याण समिती राजेश पाडवी, महिला हक्क व कल्याण समितीवर मोनिका राजळे या अध्यक्ष राहणार आहेत. इतर मागासवर्गीय कल्याण समितीवर किसन कथोरे, मराठी भाषा समितीपदावर अतुल भातखळकर, विशेष हक्क समिती राम कदम, धर्मादाय खासगी रुग्णालय तपास समिती नमिता मुंदडा आणि आमदार निवास व्यवस्था समितीच्या अध्यक्षपदावर सचिन कल्याणशेट्टी यांची नियुक्ती करण्यात आली आहे