‌‘रयत’साठी दत्तूशेठ यांचे भरीव योगदान: खा. शरद पवार

शेकापचे नेते स्व. दत्तूशेठ पाटील यांच्या स्मारकाचे अनावरण

| पनवेल | प्रतिनिधी |

रयत शिक्षण संस्थेचे रोपटे रायगड जिल्ह्यात आणून या रोपट्याचे वटवृक्ष करण्याचे काम शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार स्व. दत्तूशेठ पाटील आणि त्यांचे सहकारी स्व. जनार्दन भगत, स्व. दि.बा. पाटील यांनी केले, असे प्रतिपादन देशाचे माजी कृषीमंत्री, खासदार शरद पवार यांनी केले. मंगळवार, दि. 8 जुलै रोजी सकाळी 11 वाजता नावडे येथे प.जो. म्हात्रे हायस्कूल आणि आत्माराम धोंडी म्हात्रे जुनियर कॉलेजच्या पटांगणामध्ये माजी आमदार तथा रयत शिक्षण संस्थेचे माजी उपाध्यक्ष स्व. दत्तूशेठ पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी पवार बोलत होते.



यावेळी व्यासपीठावर शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील, सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुख, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, कर्मवीर भाऊराव पाटील यांचे नातू आणि रयतचे संघटक अनिल पाटील, माजी आमदार दत्तात्रय सावंत, माजी आ. बाळाराम पाटील, श्रीकांत देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.

शरद पवार पुढे म्हणाले की, दत्तूशेठ पाटील आणि आमचे घरोब्याचे संबंध आहेत, आम्ही दोघांनीही विधिमंडळामध्ये काम केले आहे. दत्तूशेठ पाटील यांचा वारसा बाळाराम पाटील त्याच निष्ठेने चालवत आहेत. दहा वर्षांपूर्वी रयत शिक्षण संस्थेच्या कोकण विभागाची जबाबदारी बाळाराम पाटील यांच्यावर सोपवली गेली असून, ते आजपर्यंत मोठ्या निष्ठेने ती पार पडत आहेत.



राज्यातील सर्व जिल्ह्यात पसरलेल्या या सर्वात मोठ्या शिक्षण संस्थेत कष्टकरी, शेतकरी, कामगार वर्गातील जवळपास चार लाखांच्या वर विद्यार्थी शिक्षण घेत असल्याची माहिती शरद पवार यांनी दिली.तसेच रयत शिक्षण संस्था ही देशातली एक अत्यंत महत्त्वाची आणि सामान्य कुटुंबातल्या मुलांच्या शिक्षणाची गरज भागवण्यासाठी काम करणारी संस्था असल्याचा उल्लेख करत कर्मवीर भाऊराव पाटील यांनी आपलं उभं आयुष्य हे ज्ञानदानाच्या कामासाठी दिलं. एका लहानशा शाळेपासून त्यांनी सुरुवात केली आणि आज हा कर्मवीरांच्या वटवृक्षाची पाळंमुळं महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यापर्यंत पोहोचली आहेत. त्यामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, अहमदनगर, रायगड, रत्नागिरी, बीड आहे. आज जवळजवळ 635 च्या आसपास शाखा असणारी महाराष्ट्रातली एकमेव संस्था कोणती? हा जर प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर रयत शिक्षण संस्था असंच देता येईल. दत्तूशेठ पाटील यांनी एकेकाळी रयत शिक्षण संस्थेचा उपाध्यक्ष म्हणून काम पाहिलं. आज ते हयात नाहीत, पण त्यांचं काम तुमच्या-आमच्या सगळ्यांच्या अंत:करणात आहे. त्यामुळे साहजिकच एक इच्छा होती की, रायगड जिल्ह्यामध्ये रयतेचा झेंडा पोहोचवण्याच्यासाठी ज्यांनी काम केलं त्यांचं नित्य स्मरण व्हावं. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांनी सांगितले, रयत शिक्षण संस्था ही आशिया खंडातील सर्वात मोठी शैक्षणिक संस्था असून, महाराष्ट्रावर त्याच्या शाखा आहेत. आणि या सर्व विभागात आणि सर्व क्षेत्रात रायगड विभागाचा प्रथम क्रमांक लागतो.

दत्तूशेठ यांचा पुतळा म्हणजे साक्षात दत्तूशेठ
दत्तूशेठ यांचा पुतळा बघितल्यानंतर साक्षात दत्तूशेठ आपल्यापुढे उभे आहेत, असं वाटतं. आणि, त्यांच्याबरोबर जी दोन बालक आहेत, विद्यार्थी आहेत, याचा अर्थ स्पष्ट होतो की, ज्ञानदानाच्या संदर्भात जे त्यांनी काम केलं, ते पुढे घेऊन जाण्यासाठी दत्तूशेठ आजही आपल्यामध्ये आहेत. त्याचंच दर्शन या पुतळ्याच्या माध्यमातून होत आहे. आणि म्हणून या पुतळ्याचं अनावरण करताना मला स्वतःला मनापासून आनंद होतोय. जे कष्ट दत्तूशेठ यांनी केले, त्याची नोंद घेण्यासाठी हा पुतळा भाग पाडेल आणि नेमक्या याच कामाची परंपरा बाळाराम पाटील यांनी आपल्या खांद्यावर घेतलेली आहे. रयत शिक्षण संस्थेच्या कोकण विभागाच्या सगळ्या कामाचं नेतृत्व आज बाळाराम पाटलांनी करावं, अशी संस्थेच्या सर्व लोकांची इच्छा होती आणि ती जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. ते स्वतः अत्यंत बारकाईने या कामांमध्ये लक्ष घालतात, याचा मला आनंद असल्याचे गौरवोद्गार यावेळी शरद पवार यांनी काढले.
Exit mobile version