कोतवाल बुद्रुक येथील घटना
| पोलादपूर | प्रतिनिधी |
तालुक्यातील कोतवाल बुद्रुक येथे रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मुरलीधर दरेकर यांच्या सुनेने गुरुवारी (दि.1) सकाळी राहत्या घरी गळफास घेतल्याची घटना घडली. गार्गी गणेश दरेकर (24) पूर्वाश्रमीची नेहा सदाशिव दळवी असे मृत विवाहितेचे नाव आहे.
गार्गी या उशिरापर्यंत न उठल्याने कुटुंबियांनी दुसऱ्या चावीने खोलीचा दरवाजा उघडला असता त्या गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्या. घटनेची माहिती मिळताच पोलादपूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देत तपास सुरू केला. मृत महिलेचा भाऊ प्रथमेश शिवाजी दळवी (28) यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. महाड उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप काळे, पोलादपूरचे सहायक पोलीस निरीक्षक विजय सुर्वे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक मंगेश मुंडे पुढील तपास करीत आहेत. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.






