| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबाग समुद्रकिनारी डॉल्फीनचा पिल्लू मृतावस्थेत सापडला. ही घटना बुधवारी (दि.10) सायंकाळी घडली आहे. मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र समुद्रातील प्रदूषण, मासेमारीच्या जाळ्यात अडकणे, वाहतूकीमुळे झालेली दुखापत तसेच इतर काही कारणांमुळे छोट्या डॉल्फीन मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला असून तो साधारण दोन ते अडीच फुट लांबीचा असल्याची शक्यता वर्तविली आहे. अलिबागमधील न्यायालयाच्या मागे असलेल्या किनारी छोटा डॉल्फीन मृतावस्थेत असल्याचे स्थानिकांच्या निदर्शनास आले. शवविच्छेदनाच्या अहवालानंतर त्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. डॉल्फीनच्या मृत्यूने पर्यावरणप्रेमींमध्ये चिंता व्यक्त करण्यात आली असून खळबळ उडाली आहे. स्थानिकांच्या मदतीने मृत डॉल्फीनचे किनारी वाळूमध्ये दफन करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.






