विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या आधी अजित पवारांचे बंड झाले. त्यामुळे विरोधक काहीसे मरगळलेले असणार हे उघड होतं. तरीही काँग्रेसने बऱ्याच प्रमाणात आक्रमकता दाखवून कसर भरून काढली. संभाजी भिडेंच्या गुन्हेगारी स्वरुपाच्या वक्तव्यांविरुध्द पृथ्वीराज चव्हाण व बाळासाहेब थोरात यांनी प्रहार केले. पण भिडे यांना अटक करण्यास मात्र ते भाग पाडू शकले नाहीत. भिडे यांच्याविरुध्दचे आरोप तपासून घेऊ हेच सरकार पुन्हा पुन्हा सांगत राहिले. शेवटी तर भिडे यांच्या सभेचा पुरावाच उपलब्ध नाही असेही सांगितले गेले. थोडक्यात विरोधकांना न जुमानता वाटेल तसा कारभार करता येऊ शकतो हे आता शिंदे-फडणवीस-पवार यांच्या सरकारला कळून चुकलेले आहे. विधानसभेचा विरोधी पक्षनेता ठरवण्यात काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी अक्षम्य दिरंगाई केली. विजय वडेट्टीवारांची निवड अगदी अखेरीला झाल्याने ते काहीच प्रभाव टाकू शकले नाहीत. वडेट्टीवार हे मूळचे शिवसेनेचे. नारायण राणे यांच्यासोबत ते काँग्रेसमध्ये आले. त्यांच्या पदासाठी भोरचे संग्राम थोपटे इच्छुक होते. आता त्यांना न्याय द्यायला तयार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याने सत्यजित तांबे यांची नवी आवृत्ती पाहायला मिळते की काय असे वाटू लागले आहे. दुसरीकडे शरद पवार गटाचे जयंत पाटील व जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधाची धार यावेळी एकदम बोथट झालेली दिसली. नरेंद्र मोदींना शरद पवार यांच्याच हस्ते टिळक पुरस्कार दिला गेल्याने राष्ट्रवादीच्या मागे राहिलेल्या गटात संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे. त्याचे स्पष्ट प्रत्यंतर या अधिवेशनात आले. विधानपरिषदेत शेकापचे भाई जयंत पाटील यांच्यासारख्यांचा अपवाद वगळता विरोधी बाकांवरून कोणी बोलणारेच उरलेले नाही. नीलम गोऱ्हे यांनी विधानभवनात केलेला शिंदे गटात प्रवेश हा आक्षेपार्ह होता. त्याला अनुषंगून पाटील यांनी सरकारला खिंडीत पकडले. पण त्यांना साथ देणारे कोणी नसल्याने अखेर गोऱ्हे यांच्याविरुध्द पूर्वी अविश्वासाचा ठराव दिलेल्या प्रवीण दरेकर यांनीच त्यांच्यावर विश्वास व्यक्त करणारा ठराव मांडला. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 41 हजार कोटींच्या पुरवण्या मागण्या मंजूर करून घेऊन सरकारने बाजी मारली. शिवाय, आमदारांना भरपेट निधीचे वाटप करून टाकून नाराजांना खूष करून टाकले. त्यामुळे भरत गोगावले व इतरांचे ताबूत थंड झाले. रायगडसह अन्य जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदातही तूर्तास तरी बदल होणार नाही असे दिसते. मध्यंतरी अजित पवार मुख्यमंत्री होणार या चर्चेने बरीच उचल खाल्ली होती. पण एकनाथ शिंदे हे दिल्लीत सहकुटुंब जाऊन मोदी व अमित शाह यांना भेटून आल्यापासून एकदम जोरात आहेत. अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना शिंदे यांनी सेनेप्रमाणेच अजितदादांच्या समर्थकांवरही अप्रत्यक्ष टीका केली. या दरम्यान अजितदादा व शरद पवार यापैकी कोणाच्या गटात किती आमदार आहेत हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. दोन्ही गटांची आरोपबाजीही थांबली आहे. आता आमदारांच्या अपात्रतेबाबत अध्यक्ष निर्णय देतील तेव्हाच बदलले तर राजकारण बदलेल.