घातक जेलिफिशचे समुद्रात पुन्हा थैमान

जिल्ह्यातील मासेमारी ठप्प; हजारो नौका किनाऱ्यावर

| मुरूड-जंजिरा | वार्ताहर |

रायगड जिल्ह्याच्या किनारपट्टीवर घातक जेलिफीशने पुन्हा एकदा थैमान घातले आहे. जेलिफिशची वाढ झाल्याने मासळी मिळणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे बाजारात माशांचे उत्पादन घटले आहे. मच्छीमारांवर उपासमारीचे संकट ओढवल्याने नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी जोर धरत आहे.

श्रीवर्धन तालुक्यातील दिघी, आदगाव, दिवेआगर, भरडखोल, जीवना, दांडा, बागमांडला, तर मुरुड, राजपुरी, एकदरा आणि अलिबाग तालुक्यातील नवेदर नवगाव, रेवस, बोडणी, मांडवा, वरसोली, थेरांडा या ठिकाणी मासेमारीची बंदरे आहेत. समुद्रात पुन्हा एकदा जेलिफिशचा उपद्रव वाढल्याने मासेमारीसाठी गेलेल्या बोटींना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. सततच्या जेलिफीशच्या प्रभावाने मत्स्यव्यावसाईक चिंताग्रस्त झाले आहेत. सप्टेंबर महिन्यानंतर जेलिफिश मोठया प्रमाणावर येण्याची दुसरी वेळ आहे, अशी माहिती राजपुरी येथील स्थानिक मच्छिमारांनी दिली. या संकटामुळे सुमारे 100 पेक्षा अधिक मासेमारी यांत्रिक नौका किनाऱ्यावर नांगरण्यात आलेल्या आहेत. रायगडच्या किनारपट्टीवर हिच संख्या हजारोच्यावर असल्याचे दिसून येते. त्यामुळे दररोजच्या कोट्यवधी रुपयांच्या उलाढालीची गती मंदावली आहे. वादळी हवामानामुळे देखील तीन वेळा मासेमारी बंद ठेवावी लागली होती.

जेलिफिशला कोळी बोली भाषेत 'आग्या मका' असे म्हणतात. जेलिफिशचा शरीराला स्पर्श झाल्यास अंगाला सतत खाज आणि दाह होतो. त्यामुळे मच्छिमार अधिक सावधानता बाळगत आहेत. स्थानिक बाजारामध्ये ताजी मासळी दिसून येत नाही. जी मासळी येते ती बाहेरुन आयात केलेली आहे, अशी माहिती मच्छिमारांनी दिली.
एलईडी मासेमारीचा घातक परिणाम
समुद्रात बेकायदेशीर एलईडी मासेमारी करण्यामुळे समुद्राच्या तळाशी असलेली जेलिफिश हि एलईडीच्या प्रकाशाकडे आकर्षित होते, अशी माहिती रोहन निशानदार यांनी दिली. जेलिफिशमुळे मासेमारी बंद करावी लागली असून मोठ्या नुकसानीला तोंड द्यावे लागत असल्याची माहिती रायगड जिल्हा मच्छिमार संघाचे उपाध्यक्ष आणि राज्य मच्छिमार शिखर परिषदेचे संचालक मनोहर बैले यांनी दिली. शासनाकडून याबाबत कोणतीही उपाययोजना करण्यात आली नसल्याचे बैले यांनी स्पष्ट केले. पारंपारिक मासेमारी हंगामाचा निम्म्यापेक्षा आधिक काळ वारंवार संकटांना तोंड देत काढावा लागत आहे. याकडे लक्ष न दिल्यास पुढील काळ मच्छिमारांसाठी अतिशय कठीण येऊ शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
Exit mobile version