रायगड जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा!

महाडमध्ये 21 ऑक्टोबरला संदीप सकपाळ यांचे ठिय्या आंदोलन

| महाड | प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यात केवळ श्रीवर्धन तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आल्याने महाडसह संपूर्ण रायगड जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पक्षाचे महाड तालुकाध्यक्ष संदीप बाबाजी सकपाळ यांनी 21 ऑक्टोबर रोजी महाड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ठिय्या आंदोलन आयोजित केले आहे.

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्याची मागणी या आंदोलनातून करण्यात येणार आहे. कोकणातील चारा वनव्यामध्ये जळून खाक होण्यापूर्वी रोजगार हमी योजनेतून कापून घेण्यात यावा, जेणेकरून स्थानिकांना रोजगार मिळेल आणि चारा टंचाईवर मात करता येईल, अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय वाहत्या ओढ्या-नाल्यांवर श्रमदानातून तातडीने मातीचे बांध घालावेत, यासाठी ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभा घेऊन ग्रामस्थांना कामासाठी प्रोत्साहित करावे. शाळा व महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) आणि राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) यांची शिबिरे आयोजित करून श्रमदानातून मातीचे बांध घालावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे.

कुंभमेळ्यावरील खर्च कमी करून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत द्यावी, तसेच शेतकऱ्यांच्या मुलांची शैक्षणिक फी माफ करावी, या मागण्यांचाही आंदोलनात समावेश आहे. महाडसह रायगड जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी संदीप सकपाळ यांनी केली आहे.

Exit mobile version