विरोधकांमधील देशद्रोही जाहीर करा; दानवे यांचे सरकारला आव्हान

| मुंबई | दिलीप जाधव |

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधान परिषदेत विरोधी पक्षाच्या आमदारांनी आक्रमक भूमिका घेत थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. सरकारच्या चहा-पाण्याच्या कार्यक्रमाला बहिष्कार करणार्‍या महाविकास आघाडीच्या आमदारांना ‘देशद्रोही’ संबोधले होते. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी तीव्र शब्दात निषेध करत विरोधी आमदारांमध्ये ‘देशद्रोही’ कोण आहे? यावर मुख्यमंत्र्यांनी खुलासा करावा, अशी मागणी केली.

अंबादास दानवे म्हणाले की, राज्य सरकारला महाराष्ट्रद्रोही म्हणत आम्ही सरकारी चहा-पाणी कार्यक्रमावर बहिष्कार टाकला होता. आपल्या वक्तव्यात राज्य सरकार महाराष्ट्रविरोधी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी मान्य केले आहे. मात्र, त्याचवेळी मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षाच्या आमदारांना देशद्रोही म्हटले आहे. जे लोकशाहीसाठी घातक आहे.

अंबादास दानवे म्हणाले की, आमच्यापैकी कोण देशद्रोही आहेत? कसा देशद्रोह केला गेला. मुख्यमंत्र्यांना त्यांचे आरोप सिद्ध करावे लागतील. मुख्यमंत्र्यांनी ज्या प्रकारची विधाने केली, त्यातून हे राज्य सरकार खरोखरच ‘महाराष्ट्रविरोधी’ वाटू लागले आहे. त्यामुळे आजही आम्ही आमच्या वक्तव्यावर ठाम आहोत. यासोबतच दानवे यांनी उपसभापती नीलम गोर्हे यांना मुख्यमंत्र्यांना त्यांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देण्याचे निर्देश द्यावे, अशी विनंती केली.

संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, जेव्हा मुख्यमंत्री सभागृहात उपस्थित राहतील तेव्हा त्यांच्या विधानावर आक्षेप घेतल्यास ते त्याला उत्तर देतील. विरोधी पक्षाचे आमदार कसे देशद्रोही आहेत. याबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्‍न विचारला पाहिजे. मात्र, त्याआधी राज्य सरकार कसे महाराष्ट्रविरोधी आहे हेही विरोधकांनी सिद्ध करावे, असेही त्यांनी सुचित केले.

चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर असमाधान झालेल्या शिवसेनेच्या (ठाकरे गट) आमदारांनी विधान परिषदेत घोषणाबाजी सुरू केली. नहीं चलेगी नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी या प्रकाराच्या घोषणा विरोधी पक्षाच्या आमदारांनी उपसभापतींच्या आसनासमोर येऊन दिल्या. त्यानंतर उपसभापती नीलम गोर्हे यांनी घोषणाबाजी करणार्‍या आमदारांना शांत राहण्याचे आवाहन केले. अर्थसंकल्पिय अधिवेशन सुमारे महिनाभर चालणार आहे. मुख्यमंत्री लवकरच विधान परिषद सभागृहात येणार आहेत. असे संसदीय कामकाज मंत्र्यांनीही म्हटले आहे. त्यामुळे सभागृहाचे इतर कामकाज आज शांततेत पूर्ण करावे. अस उपसभापती म्हणाल्या मात्र विरोधी पक्षाच्या आमदारांची घोषणाबाजी सुरूच होती. त्यामुळे सभागृहातील गदारोळात राज्यपालांच्या अभिभाषणावर आभार प्रदर्शनाचा प्रस्ताव, वर्ष 2022-23 च्या पुरवणी मागण्या आणि सभापती तालिका सदस्यांची नियुक्ती करण्याची घोषणा केली .

Exit mobile version