| रत्नागिरी | प्रतिनिधी |
नवरात्रौत्सवात वाढलेली फळांची आवक कायम असून, त्यामुळे दरात घसरण झाली आहे. एरवी प्रतिकिलो दोनशे रुपयांवर असलेले सफरचंदच्या किमती 60 ते 120 रुपये किलोपर्यंत खाली घसरल्या आहेत. पेरूही स्वस्त झाला असून, 50 रुपये किलोपर्यंत दर आहे. भाजीपाल्यांची आवक काहीशी मंदावली आहे, त्यात उठाव अधिक असल्याने दर तेजीत आहेत.
दिवाळीच्या तोंडावर बाजारात ग्राहकांची रेलचेल पाहावयास मिळत आहे. कडधान्य मार्केटमध्ये डाळी, खाद्य तेलासह इतर खरेदीसाठी गर्दी उसळली आहे. खरेदी वाढली असली तरी गेल्या आठवड्याच्या तुलनेत दरात फारसा चढ-उतार दिसत नाही. परतीच्या पावसाने सगळीकडेच झोडपून काढल्याने भाजीपाल्यांच्या आवकवर परिणाम झाला आहे, त्यामुळे दरात वाढ झाल्याचे व्यापार्यांचे म्हणणे आहे. वांगी 80, टोमॅटो 30 ते 50, गवार 100 रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. इतर भाज्यांचे दरही काहीसे तेजीत आहेत. गेल्या आठवड्यात 15 ते 20 रुपये पेंढी असलेल्या कोथिंबीरने मात्र भाव खाल्ला आहे. 30 रुपयांना जुडी मिळत आहे.
मेथी, पोकळा, शेपू, पालक या भाज्यांचे दरही तेजीत आहेत. मेथी 15 ते 20 रुपये तर कांदा पात 20 रुपये पेंढी असा दर राहिला आहे. कोबीची आवक वाढल्याने दरात काहीशी घसरण झाली आहे. कांदे-बटाट्याचे भावही वधारलेलेच आहे. कांदे शंभर रुपयांना दोन किलो, तर बटाटे अडीच किलोने विक्री होत आहेत.