| पनवेल | वार्ताहर |
बाजारात टोमॅटो, हिरवा वाटाणा आणि मिरची यांच्या दरात स्पर्धा रंगली असताना ‘लसूण’ने देखील भाव खाण्यास सुरुवात केली आहे. घाऊकमध्ये 180 रुपये प्रतिकिलो दराने उपलब्ध असलेल्या लसणाने किरकोळ बाजारात द्विशतक पार केले असून 210 ते 230 रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहे. त्यामुळे जेवणातील फोडणी महाग झाल्याने गृहिणीच्या किचन बजेटला देखील महागाईंची फोडणी बसत आहे.
पनवेलमधील कांदा-बटाटा घाऊक बाजारात लसूण दर 175 ते 180 रुपये प्रतिकिलो पोहोचला आहे. तर किरकोळ बाजारात 210-230 रुपयांपर्यंत लसूण दराने मजल मारली आहे. यंदा लसूण लागवड कमी आहे. शिवाय समाधानकारक पाऊस नसल्याने मागील दोन महिन्यांपासून सातत्याने लसूण दर वधारत आहेत. एप्रिलपासून शेतकऱ्यांनी लसूण उत्पादन कमी आहे. त्यामुळे बाजारात लसूण आवक घटली आहे. गेल्या एप्रिल-मे मध्ये लसूण दरात किरकोळ वाढ झाली होती. मात्र, जून-जुलै मध्ये लसून दर कडाडण्यास सुरुवात झाली आहे. आता जुलैमध्ये टोमॅटोपेक्षाही लसून दराने उच्चांक गाठला आहे. समाधानकारक पाऊस नसल्याने लसून उत्पादन घटत आहे. त्यामुळे लसूण दरात वाढ होत आहे. पावसाने यापुढेही दडी मारली तर लसूण आणखी महागण्याची शक्यता असल्याचे मत लसूण व्यापाऱ्यांनी व्यक्त केले आहे.