53 लाख रुपये खर्चून उभारली सुसज्ज इमारत
नेरळ | वार्ताहर |
कर्जत तालुक्यातील कशेळे ग्रुप ग्रामपंचायतीची नवीन इमारत शासनाच्या विविध निधीमधून उभी राहिली आहे. 53 लाख रुपये खर्चून उभ्या राहिलेल्या इमारतीचे लोकार्पण माजी आमदार सुरेश लाड यांच्या हस्ते करण्यात आले.
तालुक्यातील कशेळे या अनेक गावांचा समावेश असलेल्या ग्रामपंचायतीचे कार्यालय बैठ्या स्वरूपात होते. ग्रामपंचायतची विद्यमान सदस्य मंडळ यांनी गेली दोन वर्षे अखंड मेहनत घेऊन नवीन दुमजली कार्यालय साकारले आहे. या कर्जत विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सुरेश लाड यांचा दहा लाखांचा आमदार निधी, जनसुविधा योजनेतून दहा लाख आणि रायगड जिल्हा परिषदने तीन लाखांचा निधी दिला होता. तर, ग्रामपंचायतने आपला दहा लाखांचा ग्रामनिधी देऊन हे भव्य कार्यालय उभे केले आहे. थेट सरपंच हर्षला राणे आणि त्यांचे सहकारी यांनी एकत्र येत ग्रामपंचायत कार्यालयाची दुमजली इमारत साकारली आहे.
या ग्रामसचिवलाय कार्यालयाचे लोकार्पण कर्जत विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सुरेश लाड यांचे हस्ते झाले. त्यावेळी जि.प. सदस्या रेखा ठाकरे, माजी सरपंच आणि जिल्हा परिषद सदस्य नारायण डामसे, कर्जत पंचायत समिती सदस्या सुरेखा हरपुडे, कर्जतचे माजी नगराध्यक्ष शरद लाड, राजेश लाड, शेकापचे ज्येष्ठ कार्यकर्ते राजू हरपुडे, उदय पाटील, भास्कर देसले यांच्यासह ग्रामपंचायत सरपंच हर्षला राणे, बोरिवली ग्रामपंचायतच्या सरपंच वृषाली क्षीरसागर, उपसरपंच आत्माराम खंडागळे, वृषाली खंडागळे, ग्रामपंचायत सदस्य माधुरी हरपुडे, अल्पना मते, कुमार शेळके, आदित्य गायकवाड, बांगरे आदी उपस्थित होते.