पशूपक्षांसह आदिवासी समाजाचाही आदिवास धोक्यात
ठोस उपास योजनांची आवश्यकता
। सुधागड-पाली । गौसखान पठाण ।
नैसर्गिकरित्या किंवा मानवांच्या करणीमुळे जिल्ह्यातील जंगलपरिसरात लागलेल्या आगीच्या घटना काही नवीन नाहीत. मात्र मानवी हव्यास, सातत्याने बदलणारे ॠतुमान अशा विविध कारणांमुळे जंगल परिसरात लागणार्या वणव्यांचे प्रमाण वाढत जात असून, यामुळे जिल्ह्यातील वनसंपदेवर आघात वारंवार आघात होत आहेत.
या विनाशकारी घटनांमुळे वनातील पशूपक्षी तसेच अन्य सजीवांसह आदिवासी समाजाचाही आदिवास धोक्यात येत आहे. यामुळे जैवविविधता धोक्यात येत असून, प्रसंगी रायगड जिल्हा निसर्गराजीने सजलेला प्रदेश अशी आपली ओळख गमावून बसेल. याच अनुषंगाने निसर्गप्रेमी तथा अन्य सेवाभावी संस्थांकडून ठोस उपाय योजनांची आवश्यकता करण्याची मागणी करण्यात येत आहे. महाराष्ट्राच्या पश्चिम घाटाच्या पूर्वेकडील चिंचोळा भाग म्हणजे कोकण. यातच रायगड जिल्ह्याला नैसर्गिक, ऐतिहासिक, धार्मिक, आधुनिक असा संमिश्र वारसा लाभला आहे. मात्र, दिवसागणिग नैसर्गिक आणि ऐतिहासिक वारसा वणव्यांमुळे धोक्यात येत आहे.
काही दिवसांपूर्वी माणगाव तालुक्यातील विळे भागाड एमआयडीसी भागातील डोंगरावर व माळरानावर प्रचंड मोठा वणवा लागला होता. येथील स्थानिक पर्यावरण व निसर्ग अभ्यासक राम मुंढे यांनी या भागाची पाहणी केली असता या वनव्यामध्ये ठिपकेवाली मुनिया आणि इतर पक्षांची घरटी पूर्णपणे जळून गेली आहेत. शिवाय पूर्ण विकसित झालेली अंडी देखील जळाली आहेत. अशाच प्रकारचे वणवे ठिकठिकाणी लागणे सुरू झाले आहे. पालीतील सरसगड किल्ल्यावर मागील वर्षी तब्बल 6 वेळा वणवा लागला होता. यामध्ये नव्याने लावलेले रोपे व वृक्ष जळून खाक झाली होती. शिवाय येथील माकडे, वानरे व पक्ष्यांच्या अन्नाचा प्रश्न निर्माण झाला. तसेच त्यांचा अधिवास देखील नष्ट झाला.
पावसाळ्यात जिल्ह्यातील डोंगर, माळरान, किल्ले, गड, जंगल या सर्व ठिकाणी पावसाळ्यात मोठया प्रमाणात छोटी झुडपे व गवत उगवते. ऑक्टोंबरनंतर वाढत्या उष्म्याने ही झुडप व गवत सुकते आणि अशा माळरान, डोंगर व शेतात सुकेल्या झुडप व गवताला नैसर्गिकरीत्या वणवा लागतो, तर काही लोक कळत-नकळत आग लावतात. या आगीचे रुपांतर प्रचंड नैसर्गिक व कृत्रिम वणव्यात होते.
दरवर्षी जिल्ह्यात हजारो हेक्टर क्षेत्रावर असे वणवे लागतात. परिणामी या आगीत झाडे-झुडपे, पशू-पक्षी, सूक्ष्मजीव तसेच सरपटणारे प्राणी यांचा जळून मृत्यु होवुन सजीवसृष्टीवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. जिल्ह्यातील विविध ऐतिहासिक वास्तू आणि किल्लयांवरील हे वणवे या ऐतिहासिक वस्तूंना देखील नुकसान पोहचवत आहेत. सध्या अशा वनव्यांना मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आहे.
यातील बहुतांश वणवे हे मानवनिर्मित असतात. नोव्हेंबर अखेरपासून व मार्च नंतर पानगळ सुरू झाल्यावर या दोन वेळा जिल्ह्यात वणवे लागत. यावेळी पक्षांचा विणीचा हंगाम असतो. त्यामुळे पक्षी, त्यांचा अधिवास, त्यांची पिल्ले आणि अंडी नष्ट होतात. तसेच वणव्यामुळे महत्वाची जैवविविधता धोक्यात येते.
या वणव्यांवर नियंत्रण आणणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच वनविभागाने हि बाब गंभीरतेने घेवून तत्काळ उपायोजना करणे आवश्यक आहे.
- पशूपक्षी, कीटक, रानफुले, मृदा आदींना प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या वणव्याची झळ बसते. वणवे रोखण्यासाठी वन विभागाकडून जनजागृती व प्रबोधन केले जाते. अत्याधुनिक फायर ब्लोअर द्वारे वणवे विझविले जातात. जळरेषा काढली जाते. – समीर शिंदे, वनक्षेत्रपाल, कांदळवन, अलिबाग







