। कल्याण । वृत्तसंस्था ।
महावितरण मंडळाकडून पनवेल विभागात उच्चदाब ग्राहक मे. ऑस्कर इन्फ्रा या स्टोन क्रशरच्या मीटरचा एमआरआय अहवालची चाचणी केली असता, या चाचणीमध्ये अनियमितता आढळून आली व जून 2021 पासून कमी नोंद होत असल्याचे दिसून आले. याप्रकरणी कंपनीचे मालक जियाउद्दीन इक्बाल पटेल यांची 1 कोटी 29 लाख 16 हजार रुपयेची 7,23,698 केव्हीएच युनिटची वीजचोरी वाशी मंडळाने उघडकीस आणली असून उद्योजकाविरुद्ध पनवेल शहर पोलीस ठाण्यात वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाई दरम्यान, स्टोन क्रशर कंपनीचे मालक जियाउद्दीन इक्बाल पटेल व त्यांचे दोन भागीदार रफिउद्दिन इकबाल पटेल व खालिद इकबाल पटेल या तिघांवर मे 2021 ते 9 डिसेंबर 2021 या कालावधीत 5,94,711 केव्हीएच युनिटची रु. 1 कोटी 15 लाख, 87 हजार 999 ची वीजचोरी केल्याचा गुन्हा नोंदवला आहे. ही वीजचोरी उघड करण्यात वाशी मंडळाच्या चाचणी विभागाने विशेष मेहनत घेतली असून मुख्य अभियंता भांडूप परिमंडल श्री. सुरेश गणेशकर यांनी संबंधित सर्व अधिकारी व कर्मचार्यांचे कौतुक केले.
वीजचोरी करणे एक असामाजिक कृत्य आहेच शिवाय एक गुन्हा देखील आहे. ग्राहकांनी असा कृत्यापासून दूर राहावे. ग्राहक वीजचोरी करित असल्याचे आढल्यास सदर ग्राहकावर असाच गुन्हा दाखल करण्यात येईल. यामध्ये ग्राहकास रोख दंडाशिवाय अटक सुद्धा होऊ शकते. म्हणून प्रामाणिकपणे विजेचा वापर करुन वापरलेल्या विजेचे पैसे भरावे असे आवाहन भांडूप परिमंडलचे मुख्य अभियंता श्री. सुरेश गणेशकर यांनी केले आहे.