। मुंबई । प्रतिनिधी ।
एसटीचं राज्य सरकारच्या परिवहन खात्यामध्ये विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी एसटी कर्मचार्यांचे आंदोलन अद्यापही सुरुच आहे. बैठकांच्या फेर्या घेऊनही एसटी कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. त्यामुळे विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपण्यापूर्वी एसटी कर्मचार्यांच्या संपाचा प्रश्न मार्गी लावू, असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सभागृहात बोलताना सांगितले.
भाजप आ. आशिष शेलार यांनी एसटी संपाबाबत सभागृहात प्रस्ताव मांडला. गेल्या अनेक महिन्यांपासून एसटी कर्मचार्यांचा संप सुरू आहे. आतापर्यंत शंभर कर्मचार्यांनी आत्महत्या केली आहे. एसटी कर्मचारी पाच ते साडेपाच महिन्यांपासून भटकत आहेत. त्यांना तुटपुंजे वेतन असून वेळेवर वेतन देखील मिळत नाही. त्यामुळे सभागृहाचे सर्व कामकाज बाजूला ठेवून चर्चा करा, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली.
राज्य सरकारचं एसटी कर्मचार्यांबाबत धोरण अधिवेशन संपविण्याच्या आत सभागृहात मांडले जाईल.
अनिल परब
एसटीचं विलनीकरण झाल्याशिवाय आम्ही संप मागे घेणार नाही, असा पवित्रा कर्मचार्यांनी घेतला आहे. सध्या या प्रकरणावर न्यायालयात सुनावणी सुरू आहे. अनिल परब यांनी काही दिवसांपूर्वी एसटी कर्माचर्यांच्या विलनीकरणाचा अहवाल सभागृहात मांडला होता. त्यामधून कर्मचार्यांचं विलनीकरण शक्य नसल्याचं समोर आले होते. आता राज्य सरकार अधिवेशन संपण्यापूर्वी नेमका काय तोडगा काढतात? याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.