राजस्थानचा तोंडचा घास पळवला; मिचेल स्टार्स ठरला ‘सुपर’ हिरो
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
राजस्थान रॉयल्सने सलग दोन पराभवानंतर अखेर विजयाची चव चाखेल असे वाटत होते. राजस्थानला यशस्वी जैस्वाल व नितीश राणा यांनी विजयपथावर आणले होते. परंतु, शेवटच्या षटकात गणित बिघडले. दिल्ली कॅपिटल्सने शेवटच्या चेंडूवर हा सामना सुपर ओव्हरमध्ये खेळण्यास भाग पाडले आणि तब्बल चार वर्षानंतर सुपर ओव्हर खेळविण्यात आली. त्यात दिल्लीने रोमहर्षक विजय मिळविला. हा सामना बुधवारी (दि.16) दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियमवर पार पडला.
प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या दिल्लीचे जॅक फ्रेझर-मॅकगर्क (9) पुन्हा एकदा अपयशी ठरला आहे. त्यानंतर करुण नायर मैदानावर येताच स्टेडियमवर जल्लोष झाला; परंतु, तो तीन चेंडूच टिकला. दरम्यान, अभिषेक पोरेल व करूण नायर यांच्यात संवादाचा अभाव पाहायला मिळाला आणि करुण नॉन स्ट्रायकर एंडला भोपळ्यावर धावचित झाला. सलग दोन गडी बाद झाल्यानंतर दिल्लीच्या संघाला पोरेल व लोकेश राहुल या जोडीने सावरले. परंतु, लोकेश राहूल (38) देखील बाद झाला. त्यानंतर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात अभिषेक पोरेल (49) बाद झाला. त्यानंतर पुढील पाच षटकांत अक्षर पटेल व त्रिस्तान स्तब्स यांनी चांगली फटकेबाजी केली. मात्र, अक्षर 34 धावांवर बाद झाला. स्तब्स व आशुतोष शर्मा यांनी दिल्लीला 5 बाद 188 धावांपर्यंत पोहोचवले. स्तब्स 34 धावांवर तर, शर्मा 15 धावांवर नाबाद राहिला. दिल्लीच्या संदीप शर्माने शेवटचं षटक पूर्ण करण्यासाठी तब्बल 11 चेंडू टाकले. जोफ्रा आर्चरने 2 बळी घेतले तर तीक्षणा आणि हसरंगा यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
लक्ष्याचा पाठलाग करताना संजू सॅमसन व यशस्वी जैस्वाल यांनी राजस्थानला दमदार सुरुवात करून दिली. त्यांच्या 61 धावांच्या सलामीला रिटायर्ड हर्टचे ग्रहण लागले. संजू 31 धावांवर वेदनेमुळे रिटायर्ड हर्ट झाला. आयपीएल इतिहासात राजस्थान रॉयल्सकडून रिटायर्ड हर्ट होऊन माघारी परतलेला तो पहिलाच फलंदाज ठरला. त्यानंरत रियान पराग 8 धावांवर त्रिफळाचीत झाला. यावेळी यशस्वीने एक बाजू लावून धरली होती आणि सलग तिसरे अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर यशस्वी 51 धावांवर बाद झाला. नितीश राणाने आक्रमक फटेकबाजी करून 26 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले आणि राजस्थानला विजयासमीप पोहोचवले. 18व्या षटकात अक्षरने त्यांचा अनुभवी गोलंदाज मिचेल स्टार्कला पुन्हा आणले आणि त्याने बळी मिळवून दिले. अप्रतिम यॉर्करवर नितीश (51) बाद झाला. शेवटच्या षटकात 9 धावांची गरज असताना ध्रुव जुरेलने स्टार्क गोलंदाजीवर पहिल्या 4 चेंडूंत 6 धावा केल्या. पाचव्या चेंडूवर एक धाव आल्याने 1 चेंडू 2 धावा असा सामना चुरशीचा झाला. परंतु, ध्रुवला एकच धाव घेता आल्याने हा तब्बल चार वर्षानंतर सुपर ओव्हरमध्ये गेला. मिचेल स्टार्क, अक्षर पटेल आणि कुलदिप यादव यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
असा रंगला सुपर ओव्हरचा थरार
दिल्लीने मिचेल स्टार्सकडे सुपर ओव्हरची जबाबदारी दिली. पहिला चेंडू त्याने निर्धाव टाकला, परंतु शिमरोन हेटमायरने दुसर्या चेंडूवर चौकार खेचला. तिसर्या चेंडूवर एक धाव घेत त्याने रियान परागला स्ट्राईक दिली आणि त्याने चौकार खेचला. तो चेंडू नो बॉल ठरल्याने फ्री हिट मिळाली. तोही चेंडू स्टार्कने वाईड टाकला आणि हेटमायर पळाला. परंतु, रियान धाव पूर्ण करण्यापूर्वीच धावबाद झाला. त्यामुळे ही फ्री हिट वाया गेली. पुढच्याच चेंडूवर यशस्वी जैस्वाल देखील धाव बाद झाल्याने राजस्थानचा डाव संपला. त्यामुळे राजस्थानला 1 चेंडूला मुकावे लागले आणि धाव फलकावर 12 धावा लागल्या. राजस्थानने चेंडू अनुभवी संदीप शर्माकडे दिला. लोकेशने पहिल्याच चेंडूवर 2 धावा घेतल्या. दुसरा चेंडूवर चौकार खेचला. त्यानंतर 1 धाव घेतली. स्तब्सकडे स्ट्राईक गेली असता त्याने षटकार खेचून चार चेंडूंत मॅच संपवली. दिल्लीने आतापर्यंत 6 सुपर ओव्हरमधील 5 सामने जिंकले आहेत.