शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मुंबईत मंथन

26 राज्यांतील 70 हून अधिक नेते एकत्र; देशव्यापी आंदोलनाची रणनीती ठरणार

| पाली/बेणसे | प्रतिनिधी |

शेतीमालाला हमीभाव, वाढते कर्ज, पीक विमा, जमिनीचे हक्क, शेतकरी आत्महत्या, खतांचा तुटवडा आणि भारत-अमेरिका व्यापार करारासह विविध ज्वलंत प्रश्नांवर देशव्यापी लढ्याची दिशा निश्चित करण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेच्या केंद्रीय किसान कमिटीची दोन दिवसीय राष्ट्रीय बैठक मुंबईत सुरू आहे. 26 राज्यांतील 70 हून अधिक प्रमुख शेतकरी नेत्यांच्या उपस्थितीत होत असलेल्या या बैठकीकडे देशभरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

मुंबईतील वायएमसीए इंटरनॅशनल हाऊस येथे 28 व 29 जून रोजी आयोजित बैठकीत अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, सरचिटणीस विजू कृष्णन, उपाध्यक्ष खासदार आमरा राम, माजी खासदार हनन मोला, पी. कृष्णप्रसाद, त्रिपुराचे विरोधी पक्षनेते जितेंद्र चौधरी, बिहारचे आमदार अजय कुमार यांच्यासह देशभरातील 26 राज्यांतील 70 हून अधिक शेतकरी नेते सहभागी झाले आहेत.

बैठकीत शेतीमालाला हमीभाव, शेती कर्जमाफी, पीक विमा, जमिनीचे हक्क, शेतकरी आत्महत्या, शेतकरी महिलांचे प्रश्न, खतांचा तुटवडा, एल-निनोमुळे निर्माण होणारी दुष्काळाची शक्यता तसेच भारत-अमेरिका, भारत-युरोप आणि भारत-न्यूझीलंड व्यापार करारांचा भारतीय शेतीवरील परिणाम या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.

देशभरात विकास प्रकल्प, महामार्ग आणि औद्योगिक प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणात शेतजमिनी संपादित होत असल्याचा मुद्दाही बैठकीत उपस्थित करण्यात आला. कॉर्पोरेट कंपन्यांसाठी जमिनी संपादित करण्याच्या धोरणाला विरोध करण्यासाठी देशव्यापी आंदोलनाची रणनीती आखण्यावर भर देण्यात आला. कापूस आयात शुल्क हटविणे, खतांचा तुटवडा, ऊस नियंत्रण आदेशातील बदल, अन्नधान्य साठवणुकीत कॉर्पोरेट कंपन्यांचा वाढता हस्तक्षेप आणि तांदळापासून इथेनॉल निर्मितीमुळे देशाच्या अन्नसुरक्षेवर होणाऱ्या परिणामांबाबतही बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली.

बैठकीचे उद्घाटन किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून झाले. राष्ट्रीय सरचिटणीस विजू कृष्णन यांनी देशातील शेतीविषयक प्रश्नांवरील अहवाल सादर केला. या अहवालावर चर्चा करून आगामी काळातील देशव्यापी शेतकरी आंदोलनाची रूपरेषा निश्चित केली जाणार आहे.
या बैठकीसाठी आलेल्या शेतकरी नेत्यांचे महाराष्ट्राच्या वतीने डॉ. एस. के. रेगे, उमेश देशमुख, डॉ. अजित नवले, किसन गुजर, शैलेंद्र कांबळे, प्रा. तापती मुखोपाध्याय, जी. एम. व्ही. नायक, प्रा. मधू परांजपे, सईद अहमद, प्राची हातिवलेकर, ॲड. आरमायटी इराणी, विजय पाटील, के. नारायणन, कमल रावत, प्रीती शेखर, अशोक पवार, हरीश गायकवाड, आकाश बागुल, चंद्रकांत शिंदे, दिनेश जाधव आणि परेश सोळंकी यांनी स्वागत केले. या राष्ट्रीय बैठकीतून शेतकरी आंदोलनाला नवी ऊर्जा, नवी दिशा आणि देशव्यापी संघर्षाची प्रभावी रणनीती निश्चित होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Exit mobile version