खवय्यांची चंगळ, महागाईची फोडणी
। पाली/बेणसे । वार्ताहर |
पावसाळ्यात खाडीकिनारी चिवणी मासे मोठ्या प्रमाणात मिळू लागतात. यंदा पावसाच्या काही दिवस आधीच हे चविष्ट चिवणी मासे मिळत असून बाजारात विक्रीसाठी देखील आले आहेत. त्यामुळे खवय्ये आनंदी झाले असून त्यांची चंगळ आहे. मात्र हंगामाची सुरुवात असल्याने चिवणी मासे महाग मिळत आहेत. तरीही खवय्ये हे मासे खरेदी करताना दिसत आहेत.
या चिवणी माशांची आवक अलिबाग, पेण, उरण, पनवेल, पाली, रोहा आदी मासळी बाजारात काही प्रमाणात सुरू झाली आहे. मात्र आवक कमी असल्याने तब्बल 400 रुपये किलो आणि 300 ते 400 रुपयांना मध्यम आकाराचे 8 ते 10 मासे मिळत आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत 20 ते 30 टक्क्यांनी भाव वाढले आहेत.
हंगामातील पहिलेच चिवणी मासे असल्याने मागणी मागणी खूप आहे. खवय्ये खरेदीसाठी तुटून पडत आहेत. पाऊस सुरू झाल्यावर आवक वाढल्यानंतर चिवण्या स्वस्त होतील. या माशांच्या अंड्यांना मोठी मागणी असते.
गौरी मनोरे, मासळी विक्रेत्या,
चिवणी मासे खूप चविष्ट असतात. या मोसमात मिळणारे चिवणी मासे आवर्जून खातो.तळून किंवा कालवण करून हे मासे खाल्ले जातात.
निलेश पवार, खवय्ये, जांभूळपाडा
चिवणी मासे खाडीत सापडतो
खाडीच्या मुखाच्या भागात चिवण्या अधिक प्रमाणात सापडतात. मात्र खाडीकिनारे प्रदूषित झाल्याने चिवण्यांचे प्रमाण घटले आहे. तरीसुद्धा पावसाळ्यात चिवणी मासे मुबलक मिळतात. खाडीकिनारी हे मासे अंडी घालतात. पावसाच्या सुरुवातीला गाबोळी म्हणजेच पोटात अंडी असलेल्या चिवण्या अधिक सापडतात. आणि यावेळी मासेमार व स्थानिक लोक मोठ्या प्रमाणात चिवण्या पकडतात.