| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
नौपाडा गावासाठी आजघडीला स्वतंत्र स्मशानभूमी उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. गावासाठी पूर्वी स्मशानभूमीची व्यवस्था होती; मात्र, सिडकोच्या नियोजनातील त्रुटींमुळे ती जागा संपादित करण्यात आली. एमजीएम रुग्णालयासाठी भूखंड देताना त्यामध्ये स्मशानभूमीची जागाही समाविष्ट झाल्याने नौपाडा गाव स्मशानभूमीच्या सुविधेपासून वंचित राहिले असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर नौपाडा गावाला पर्यायी स्मशानभूमीसाठी स्वतंत्र भूखंड उपलब्ध करून देणे आवश्यक होते. मात्र, सिडकोने याबाबत योग्य ती कार्यवाही न करता वर्षानुवर्षे टाळाटाळ केल्याने आजतागायत गावासाठी स्मशानभूमीचा भूखंड उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण असून ही समस्या तातडीने सोडविण्याची मागणी होत आहे. नौपाडा गावातील नागरिकांच्या या मूलभूत प्रश्नासाठी नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. त्यांनी पनवेल महानगरपालिकेकडे याबाबत वारंवार निवेदने देऊन स्मशानभूमीसाठी योग्य जागा निश्चित करण्याची मागणी केली आहे. गावाच्या वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत स्मशानभूमीची सुविधा अत्यावश्यक असून, प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
नौपाडा स्मशानभूमीसाठी भूखंडाची मागणी
