अनधिकृत दलालांचा हस्तक्षेपाच्या तक्रारी
| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
खारघर येथील आरटीओतील अनधिकृत एडीसी (दलाल) प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे अधिकाऱ्यांची भेट घेऊन करण्यात आली. यावेळी निवेदन देखील सादर करण्यात आले.
आरटीओ कार्यालयात वाहनचालक आणि नागरिकांना वाहन नोंदणी, परवाना, फिटनेस, परमिट, वाहन हस्तांतरण यांसह विविध कामांसाठी वारंवार ये-जा करावी लागते. मात्र, या शासकीय प्रक्रियेदरम्यान काही ठिकाणी अनधिकृत दलालांचा हस्तक्षेप होत असल्याच्या तक्रारी पुढे येत असल्याचे सांगण्यात आले आहे. सामान्य नागरिकांना शासकीय कामे सहज आणि पारदर्शक पद्धतीने करता यावीत, यासाठी आरटीओ कार्यालय परिसरातील अनधिकृत दलालीला आळा घालणे गरजेचे आहे. आरटीओ कार्यालयात एडीसीमार्फत पैसे घेऊन कामे होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष शहाबाज पटेल यांनी केला आहे. याचा त्रास येथे येणाऱ्या नागरिकांना होत आहे. त्यामुळे या गैरप्रकारांना जबाबदार असलेल्या व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. परिवहन विभागाच्या कामकाजात पारदर्शकता आणणे गरजेचे आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या अनधिकृत दलालीप्रकरणी कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
कार्यालयाच्या आवारात किंवा परिसरात अनधिकृतपणे मध्यस्थी करणाऱ्या व्यक्ती कोण आहेत, त्यांना कोणाचे पाठबळ आहे आणि नागरिकांकडून किती रक्कम घेतली जाते, याची माहिती प्रशासनाने तपासावी, या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे. मागण्यांवर तातडीने कारवाई झाली नाही तर 24 ऑगस्टपासून आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारण्याचा इशारा देण्यात आला आहे.
कार्यालयात तसे काहीच नसून, त्यांनी दिलेल्या पत्राचा मी यापूर्वीच उत्तर दिले आहे.
जयंत चव्हाण
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी







