प्रहार जनशक्तीची पालिकेकडे मागणी
| पनवेल ग्रामीण | वार्ताहर |
पनवेल पालिका हद्दीत प्रभाग निहाय 500 खाटांचे सार्वजनिक माता व बाल रुग्णालय बांधण्याची मागणी बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली प्रहार जनशक्ती पक्षाकडून करण्यात आली आहे. त्या बाबतचे पत्र पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून पनवेल पालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांना देण्यात आले आहे. अशी माहिती पक्षाचे उपाध्यक्ष सुनील शिरीषकर यांनी दिली आहे.
शिरीषकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व सामान्य जनतेला शहरातील खासगी रुग्णालयांवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे नागरिकांना आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सध्या महानगरपालिकेचे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र हे प्रभाग निहाय आहे. परंतु, त्या ठिकाणी गंभीर उपचारासाठी आणि मोठ्या शस्रक्रिया पार पाडण्यासाठी आत्याधुनिक साहित्य व मोठी यंत्रसामुग्री नाही. त्यामुळे त्यांना शहरातील खासगी आरोग्य व्यवस्थे विसंबून राहावे लागते, या बाबींकडे प्रहारने लक्ष वेधले. आरोग्य सेवा ही प्राथमिक व मूलभूत गरज असताना पालिकेने याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले आहे. म्हणून पालिकेने शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून प्रभाग निहाय किमान 500 खाटांचे सुसज्ज असे सार्वजनिक माता व बाल रुग्णालये बांधावीत, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने मागणी केली आहे. असे शिरीषकर यांच्याकडून सांगण्यात आले आहे. यावेळी प्रहारच्या शिष्टमंडळात सुनील शिरीषकर यांच्यासह ॲड. मनोज टेकाडे, ॲड. अजय तापकिर, राहुल तेलंग आदी पदाधिकारी उपस्थित होते.