रिपोर्ट ‘नॉर्मल’, आरोग्य यंत्रणेचा गाफीलपणा उघड
। उरण । प्रतिनिधी ।
वशेणी गावात लेप्टो स्पारसिसचा संशयित रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. परंतु, रिपोर्ट ‘नॉर्मल’ आल्याने ग्रामस्थांच्या छातीतली धडधड आता थोडी शांत झाली आहे. मात्र, या सगळ्या प्रकरणात आरोग्य यंत्रणेचा हलगर्जीपणा पुन्हा एकदा समोर आला आहे.
दि. 4 जून रोजी वशेणीतील धनंजय पाटील यांच्या घरात लेप्टो स्पारसिसचा संशयित रुग्ण आढळून आला. दुसऱ्याच दिवशी आरोग्य विभागाने आपली हजेरी लावली आणि आजूबाजूच्या परिसरातील चौकशी करत पाटील कुटुंबियांचे रक्तनमुने गोळा केले. परंतु, त्यानंतर काय? पाच दिवस उलटून गेले तरी ना आशा वर्कर आले, ना आरोग्यसेवक. गावकऱ्यांच्या भीतीचा सर्वांनाच विसर पडल्याचे दिसून आले. संबंधित रुग्ण संजीवनी हॉस्पिटलमध्ये दाखल असल्याची माहिती खुद्द धनंजय पाटील यांनी दिली असून त्यांनी आरोग्य खात्यावर वेळेवर फॉलोअप न करण्याचा आरोप केला आहे.
या सगळ्यावर आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र इटकर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, रक्तनमुने जे.जे. हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी पाठवले होते. रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे लेप्टो स्पारसिसचा कुठलाही रुग्ण सध्या उरण तालुक्यात नाही. रिपोर्ट निगेटिव्ह आले हा दिलासा आहे, मात्र गावकऱ्यांच्या मनात घर करून बसलेली भीती आणि आरोग्य यंत्रणेचा वेळेवर न पोहोचण्याचा दोष हे प्रशासन झाकून टाकू शकत नाही.